Vitamin Deficiency file photo
आरोग्य

Vitamin Deficiency: शरीरात या ४ जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास वाढतो स्मृतिभ्रंशाचा धोका

जीवनसत्त्वांची कमतरता केवळ शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम करू शकते, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Vitamin Deficiency:

नवी दिल्ली: शरीर निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्वांचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. मात्र, जीवनसत्त्वांची कमतरता केवळ शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम करू शकते, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. विशेषतः व्हिटॅमिन D, B2, B6 आणि B12 यांची कमतरता असल्यास डिमेन्शियाचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित लॅन्सेट रिजनल हेल्थ साऊथईस्ट एशिया या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात ही बाब उघड झाली आहे. तेलंगणातील 556 मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिकांवर करण्यात आलेल्या या संशोधनात डिमेन्शियाचा धोका असलेल्या व्यक्तींमध्ये काही विशिष्ट जीवनसत्त्वांची कमतरता आढळून आली.

संशोधनात काय आढळले?

संशोधकांनी सहभागींचे वय, बीएमआय, शारीरिक हालचाल, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल यांसारख्या घटकांचा सखोल अभ्यास केला. या विश्लेषणानंतर सुमारे 39 टक्के सहभागी व्यक्तींमध्ये डिमेन्शियाचा धोका असल्याचे निदर्शनास आले. अभ्यासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. शहरी भागातील नागरिकांच्या तुलनेत ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये तसेच महिलांमध्ये डिमेन्शियाची शक्यता अधिक असल्याचे आढळले.

जीवनसत्त्वांच्या कमतरतेची धक्कादायक आकडेवारी

अभ्यासादरम्यान करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत पुढील निष्कर्ष समोर आले :

64 टक्के व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन B2 ची कमतरता आढळली.

42 टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन D चे प्रमाण कमी होते.

34 टक्के सहभागी व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन B6 ची कमतरता दिसून आली.

17 टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता नोंदवण्यात आली.

डिमेन्शिया म्हणजे नेमके काय?

डिमेन्शिया हा मेंदूशी संबंधित एक गंभीर विकार आहे. या अवस्थेत व्यक्तीची स्मरणशक्ती हळूहळू कमी होऊ लागते. विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि गोष्टी समजून घेण्याची क्षमता प्रभावित होते. आजार गंभीर स्वरूप धारण केल्यास दैनंदिन साधी कामे करणेही रुग्णासाठी कठीण बनू शकते.

तज्ञ काय सांगतात?

संशोधकांच्या मते, व्हिटॅमिन D, B2, B6 आणि B12 यांची कमतरता डिमेन्शियाच्या धोक्याशी संबंधित असू शकते. त्यामुळे संतुलित आहार, नियमित आरोग्य तपासणी आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक जीवनसत्त्वे घेणे गरजेचे आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राखण्यासाठी शरीरातील जीवनसत्त्वांचे प्रमाण योग्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT