आजच्या काळात चुकीचे खाणे, एका जागी बसून राहण्याची जीवनशैली आणि तंत्रज्ञानाचा जास्त वापर यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. लहान वयातच वजन वाढल्यास अनेक आजार होऊ शकतात. पण, वेळेवर योग्य उपाय केल्यास हे टाळता येते. सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ डॉ. गीतिका चोप्रा यांनी यासाठी काही सोप्या आणि प्रभावी टिप्स दिल्या आहेत.
१. शारीरिक हालचाली वाढवा ३ ते ७ वर्षांच्या मुलांना खेळण्याच्या माध्यमातून योगा आणि मैदानी खेळांमध्ये सामील करावे. तर ७ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना हलका व्यायाम, डान्स आणि खेळ करण्याची सवय लावावी. स्क्रीन टाइम (मोबाइल/टीव्ही पाहण्याचा वेळ) कमी करून शरीराची हालचाल वाढवावी.
२. जंक फूड बंद करा चिप्स, कोल्ड्रिंक्स, बेकरीचे पदार्थ बंद करून मुलांना आरोग्यदायी पर्याय द्या. जसे की, फ्रूट चाट, ओट्सचे धिरडे, भरपूर भाज्या घालून केलेला पराठा. जर मुलांना पिझ्झा खाण्याची इच्छा झाली, तर घरीच चपातीवर भाज्या, सॉस आणि थोडे चीज घालून आरोग्यदायी पिझ्झा बनवा.
३. सकाळचा नाश्ता कधीही चुकवू नका
सकाळचा नाश्ता म्हणजे दिवसभरासाठी ऊर्जा. त्यामुळे नाश्त्यामध्ये प्रोटीन असलेले पदार्थ द्या, जसे की पनीर, अंडी, डाळी. मुलांना कटलेटसारखे चविष्ट पण पौष्टिक पदार्थ द्या.
४. वेळेचे नियोजन ठेवा वेळेवर झोपणे आणि उठणे खूप महत्त्वाचे आहे. मुलांनी दररोज ७ ते ९ तास झोप घेतली पाहिजे. त्यांना रात्री ९-१० च्या दरम्यान झोपायला पाठवा. दररोज किमान एक तास शारीरिक हालचाल, जेवणाची ठरलेली वेळ आणि कमी स्क्रीन टाइम ठेवा.
५. पालकांनी स्वतः उदाहरण बनावे मुलं घरात मोठ्यांना पाहून शिकतात. म्हणून पालकांनी स्वतः आरोग्यदायी खाणे, व्यायाम करणे आणि योग्य जीवनशैली ठेवणे महत्त्वाचे आहे. विशेषतः आईने चांगल्या सवयी लावल्या, तर मुलांवर त्याचा चांगला परिणाम होतो.