Thigh Circumference File Photo
आरोग्य

Thigh Circumference: मांडीचा घेर ६० सेंटीमीटरपेक्षा कमी असल्यास हृदयविकाराचा धोका? संशोधनात खुलासा

शरीरातील मांडीचा घेर केवळ शारीरिक ठेवणीचा भाग नसून, तो हृदयाच्या आरोग्याबाबतही काही संकेत देऊ शकतो. मांडीचा घेर हृदयविकाराचा धोका आणि अकाली मृत्यूची शक्यता समजून घेण्यासाठी उपयुक्त...

मोहन कारंडे, पुढारी वृत्तसेवा

Thigh Circumference

मुंबई: शरीरातील मांडीचा घेर केवळ शारीरिक ठेवणीचा भाग नसून, तो हृदयाच्या आरोग्याबाबतही काही संकेत देऊ शकतो. मांडीचा घेर ६० सेंटीमीटरपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकार आणि अकाली मृत्यूचा धोका अधिक असू शकतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. मात्र, केवळ मांडीच्या मापावरून हृदयविकाराचा धोका निश्चित करता येत नाही. मांडीतील स्नायूंचे प्रमाण, शरीराची चयापचय क्रिया आणि इतर आरोग्यविषयक घटकांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

रेडिओलॉजिस्ट डॉ. हर्ष व्यास यांनी अलीकडेच एका व्हिडीओच्या माध्यमातून मांडीचा घेर आणि स्नायूंचे प्रमाण यांचा हृदयाच्या आरोग्याशी असलेला संबंध अधोरेखित केला. डेन्मार्कमध्ये झालेल्या एका संशोधनाचा संदर्भ देत त्यांनी मांडीचा घेर हृदयविकाराचा धोका आणि अकाली मृत्यूची शक्यता समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे सांगितले. याबाबत एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधील कार्डिओलॉजी विभागाचे सहयोगी संचालक आणि प्रमुख डॉ. एल. के. झा यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

मांडीचा घेर आणि हृदयाच्या आरोग्याचा काय संबंध?

मांडीचा घेर एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील एकूण स्नायूंचे प्रमाण आणि चयापचयाच्या आरोग्याबाबत काही प्रमाणात माहिती देऊ शकतो. संशोधनानुसार, मांडीचा घेर कमी असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकार आणि अकाली मृत्यूचा धोका अधिक असण्याची शक्यता दिसून आली आहे. डॉ. झा यांच्या मते, २००९ मध्ये 'बीएमजे' या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात २,८१६ महिला आणि पुरुषांचा समावेश होता. या अभ्यासात मांडीचा घेर कमी असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकार, कोरोनरी हार्ट डिसीज आणि अकाली मृत्यूचा धोका अधिक असल्याचे आढळले. विशेषतः मांडीचा घेर सुमारे ६० सेंटीमीटरपेक्षा कमी असताना हा संबंध अधिक ठळकपणे दिसून आला.

मांडीमध्ये शरीरातील सर्वांत मोठ्या स्नायूंपैकी क्वाड्रिसेप्स आणि हॅमस्ट्रिंग यासारखे काही स्नायू असतात. यामध्ये रक्तातील ग्लुकोजचा वापर, इन्सुलिनची संवेदनशीलता आणि शरीराला ऊर्जा मिळवून देण्याच्या प्रक्रियेत या स्नायूंची महत्त्वाची भूमिका असते. शरीरातील स्नायूंचे प्रमाण कमी झाल्यास ग्लुकोजचा प्रभावी वापर करण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स, चयापचयातील बिघाड आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता असते, असे डॉ. झा यांनी स्पष्ट केले. मात्र, मांडीचा घेर हा हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्याचा एक अप्रत्यक्ष निर्देशक आहे. तो स्नायू आणि त्वचेखालील चरबी दोन्ही दर्शवतो आणि त्याचा अर्थ इतर आरोग्य मापदंडांसोबत लावला पाहिजे.

चयापचय क्रियेसाठी मांडीचे स्नायू महत्त्वाचे का?

शरीरातील स्नायूंचे योग्य प्रमाण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याउलट, स्नायूंचे प्रमाण कमी असल्यास आणि शारीरिक हालचालीही मर्यादित असल्यास इन्सुलिन रेझिस्टन्स आणि चयापचयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. कालांतराने या समस्यांमुळे टाइप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. स्नायूंचे कार्य केवळ शरीराला हालचाल करण्यापुरते मर्यादित नसते. शारीरिक हालचाली करताना स्नायूंमधून 'मायोकाइन्स' नावाचे विशिष्ट संदेशवाहक रेणू बाहेर पडतात. हे रेणू शरीरातील सूज नियंत्रित करणे, ग्लुकोजचे चयापचय आणि चरबीचा वापर यांसारख्या प्रक्रियांवर प्रभाव टाकतात. चालणे, सायकल चालवणे, पोहणे आणि वजनाच्या साहाय्याने व्यायाम करणे यांसारख्या नियमित शारीरिक हालचालींमुळे शरीरातील मोठ्या स्नायूंना व्यायाम मिळतो. त्यामुळे चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. याशिवाय मांडीतील स्नायूंचे प्रमाण शरीराची कार्यक्षमता, हालचाल करण्याची क्षमता आणि व्यायाम सहन करण्याची ताकद टिकवून ठेवण्यासाठीही महत्त्वाचे असते.

मांडीचा घेर ६० सेंटीमीटरपेक्षा कमी असल्यास धोका अधिक असतो का?

२००९ मध्ये झालेल्या BMJ मधील अभ्यासात मांडीचा घेर सुमारे ६० सेंटीमीटरपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींमध्ये अकाली मृत्यूचा धोका अधिक असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. मात्र, या मोजमापाला हृदयविकाराचे निदान करण्यासाठी निश्चित निकष मानता येणार नाही, असा इशारा डॉ. झा यांनी दिला आहे. त्यांच्या मते, ६० सेंटीमीटर हा आकडा वैद्यकीयदृष्ट्या निश्चित केलेला निकष नाही. तसेच तो सर्व व्यक्तींना समान पद्धतीने लागू होत नाही. मांडीचा घेर व्यक्तीची उंची, लिंग, वय, वंश आणि शरीरातील स्नायू व चरबीचे प्रमाण यांनुसार बदलू शकतो. शिवाय, केवळ मांडीचे माप घेतल्याने त्यातील स्नायू आणि चरबीचे प्रमाण स्वतंत्रपणे समजू शकत नाही. त्यामुळे मांडीचा घेर ६० सेंटीमीटरपेक्षा कमी आहे म्हणून संबंधित व्यक्तीला हृदयविकाराचा धोका आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही. त्याचप्रमाणे मांडीचा घेर अधिक असल्याने हृदयविकारापासून संरक्षण मिळते, असेही नाही.

हृदयाच्या आरोग्यासाठी कोणत्या तपासण्या महत्वाच्या?

हृदयाचे आरोग्य केवळ मांडीच्या घेरावर अवलंबून न राहता इतर महत्त्वाच्या घटकांचीही तपासणी करणे गरजेचे आहे. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो.

रक्तदाब : रक्तदाब नियंत्रणात आहे की नाही, हे तपासणे.

रक्तातील साखर : फास्टिंग ब्लड ग्लुकोज किंवा HbA1c चाचणी करणे.

लिपिड प्रोफाइल : शरीरातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी तपासणे.

कंबरेचा घेर : पोटाभोवती साचलेल्या चरबीचे प्रमाण समजून घेणे.

शरीराची रचना : शरीरातील स्नायू आणि चरबीचे प्रमाण जाणून घेणे.

स्नायूंची ताकद : स्नायूंची कार्यक्षमता आणि शारीरिक क्षमता तपासणे.

टीप : या लेखातील माहिती सोशल मिडिया आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. कोणताही नवीन व्यायाम किंवा आरोग्यविषयक उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT