Summer Health Care Canva
आरोग्य

Summer Health Care | उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

अचानक तापमानवाढ होत अअसल्याने शरीराला यात बदलाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो.

पुढारी वृत्तसेवा

डॉ. भारत लुणावत

उन्हाचा कडाका वेगाने वाढत आहे. हवेतील वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम शरीरावर होऊन विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. त्यामुळे या दिवसांत आरोग्याची काळजी घेणे आवश्यक ठरते. अचानक तापमानवाढ होत अअसल्याने शरीराला यात बदलाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो.

दीर्घकाळ उन्हात राहिल्यास शरीराचे तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा बिघडते. त्यामुळे तीव्र डोकेदुखी, अशक्तपणा आणि थकवा, चक्कर येणे, उलट्या होणे यासारखे काही त्रास जाणवतात.

उपाय

  • म्हणजे पुरेसे पाणी प्यावे.

  • गरजेनुसार ओआरएस घ्या.

  • जाड, लोकरीच्या कपड्यांऐवजी हलके

  • सुती कपडे परिधान करा.

  • शक्यतो १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळा.

या दिवसांत घाम येण्यास सुरुवात होते. अशावेळी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि डीहायड्रेशनची समस्या भेडसावू शकते. तसेच, शरीरातील इलेक्ट्रोलाईटस् संतुलन बिघडल्याने विविध समस्या उद्भवतात.

  • तोंड आणि त्वचा कोरडी पडणे,

  • लघवीचा रंग गडद होणे,

  • थकवा आणि चक्कर येणे,

  • स्नायूंमध्ये गोळे येणे आदी त्रास होऊ शकतात.

  • अशावेळी पाण्यासोबत ताक,

  • लिंबूपाणी,

  • नारळपाणी यांचा समावेश करा.

उन्हात काम करताना टोपी किंवा स्कार्फ वापरा. अतिगरमीमुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचे त्रास वाढू शकतात. भारतात झालेल्या काही संशोधनांनुसार, उन्हाळ्यात ब्लडप्रेशर आणि हाय शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. यामध्ये वेळच्या वेळी औषधे घेणे आणि रक्तदाब, साखर तपासत राहणे आवश्यक ठरते. तसेच, आहारात मीठ आणि साखर नियंत्रित प्रमाणात ठेवा. हलका व्यायाम करा.

फळे, भाज्या, पचनास हलका असणारा आहार घ्या. या काळात उष्ण हवामानामुळे अन्न पटकन खराब होण्याची शक्यता असते आणि जीवाणूंची वाढ होते. अशावेळी रस्त्यावरील खाद्यपदार्थांमुळे आणि उलट्या, पोटदुखी आणि गॅसेसची समस्या, ताप आणि अंगदुखी अशा काही समस्या जाणवू शकतात. यावर उपाय म्हणजे शिळे अन्न खाणे टाळा. स्वच्छ व योग्यप्रकारे शिजवलेले अन्न खा. घरी बनवलेले ताक आणि लिंबूपाणी या दिवसांत प्रभावी ठरते.

डोळ्यांची व त्वचेची काळजी उन्हाची तीव्रता वाढल्याने सनबर्न, अॅलर्जी आणि डोळ्यांचे विकार वाढण्याची शक्यता असते. 'इंडियन जर्नल ऑफ ऑप्थाल्मॉलॉजी'च्या अभ्यासातूनही ही बाब दिसून आली आहे. सबब डोळ्यांची व त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन आणि गॉगल्स वापरा. उन्हात जाण्यापूर्वी चेहऱ्यावर सनस्क्रीन लोशन किंवा अॅलोवेरा जेल लावा.

बाहेरून आल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि ओलसर कपडा डोळ्यांवर ठेवा. आयआयटी दिल्लीच्या एका संशोधनानुसार, उष्णतेच्या लाटांमुळे भारतात २००० ते २०२० दरम्यान १७,००० हून अधिक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या महिन्यात आरोग्याची योग्यप्रकारे काळजी घेतल्यास आरोग्य सुरक्षित राहू शकते. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

पाणीदार फळांचा समावेश

या दिवसांमध्ये काकडी, टरबूज, खरबूज यासारख्या पाणीदार फळांचा समावेश करा. तळलेले, मसालेदार आणि जड पदार्थ टाळा. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी व्यायाम करा. पुरेशी झोप घ्या आणि थंड ठिकाणी विश्रांती घ्या. उष्णतेमुळे होणाऱ्या विकारांपासून बचावासाठी गुलकंदादी पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT