Smriti Mandhana File Photo
आरोग्य

Smriti Mandhana: स्मृती मानधना नॉनव्हेज खात नाही, वयाच्या ३०व्या वर्षीही जबरदस्त फिटनेस; जाणून घ्या तिचा डाएट आणि वर्कआउट

स्मृती मानधनाचा वयाच्या ३०व्या वर्षीही फिटनेस रूटीन शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी आहे. तिच्या फिटनेसच्या काही खास टिप्स जाणून घेऊया.

पुढारी वृत्तसेवा

Smriti Mandhana fitness tips

मुंबई: भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या दमदार फलंदाजीसोबतच तिच्या फिटनेसचीही नेहमीच चर्चा होत असते. क्रिकेटपटूंना आपल्या फिटनेसची विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र, स्मृती मानधना यासाठी वेगळी किंवा कठीण डाएट फॉलो करत नाही. ती साध्या दिनचर्येचे पालन करून स्वतःला फिट ठेवते. वयाच्या ३०व्या वर्षीही तिचा फिटनेस रूटीन शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी आहे. तिच्या फिटनेसच्या काही खास टिप्स जाणून घेऊया.

स्मृती मानधना कोणते व्यायाम करते?

शरीराची क्षमता वाढवायची असेल, तर वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करणे गरजेचे आहे, असे स्मृती मानधनाचे मत आहे. ती आठवड्यातील सहा दिवस दररोज वर्कआउट करते. यामध्ये ती प्रत्येक दिवशी वेगवेगळे व्यायाम करते. पायांची ताकद वाढवण्यासाठी स्मृती दररोज रनिंग करते. याशिवाय पायांची ताकद आणि स्नायू मजबूत करण्यासाठी स्क्वॅट्स, डेडलिफ्ट्स, लंजेस आणि पुल-अप्स यांसारखे व्यायामही करते. वर्कआउटमध्ये एकही दिवस खंड पडू नये, यासाठी ती शिस्तीने व्यायाम करते. सकाळी वेळ मिळाला नाही, तर ती संध्याकाळी जिममध्ये जाते.

कसा असतो आहार?

बहुतेक अभिनेते आणि क्रिकेटपटू आपल्या आहारात मांस, मासे आणि चिकन यांचा समावेश करतात. यामुळे शरीराला पुरेसे प्रोटीन मिळते आणि फिटनेस राखण्यास मदत होते. मात्र, स्मृती मानधनाच्या बाबतीत असे नाही. स्मृतीला घरचे आणि साधे जेवण खायला आवडते. ती शाकाहारी आहार घेते. विशेषतः ती लॅक्टो-ओव्हो व्हेजिटेरियन आहाराचे पालन करते. या आहारात धान्य, फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी यांचा समावेश असतो; मात्र मांस आणि चिकन खात नाही. शरीरातील प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी स्मृती प्रोटीन शेक आणि अंडी खाते. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी ती भरपूर पाणी तसेच नारळपाणीही पिते.

स्मृतीला कोणते पदार्थ आवडतात?

स्मृती मानधनाला मारवाडी पदार्थ आणि भेळपुरी खायला खूप आवडते. ती हे पदार्थ अधूनमधून खाते. चीट डेच्या दिवशी भेळपुरी खाणे तिला आवडते. मात्र, ती गोड पदार्थांपासून शक्यतो दूर राहते. गोड खाण्याची इच्छा झाल्यास ती डार्क चॉकलेट खाते, जे तुलनेने आरोग्यदायी पर्याय मानले जाते.

फिटनेसचा नियमही अगदी साधा

फिट राहायचे असेल, तर साधे नियम आणि शिस्त पाळणे गरजेचे आहे, असे स्मृती मानधना सांगते. ठरावीक दिनचर्या आणि वेळेचे पालन करत प्रत्येक गोष्ट शिस्तीने करणे आवश्यक आहे. एक दिवस व्यायाम करून दुसऱ्या दिवशी विश्रांती घेत राहिल्यास अपेक्षित फिटनेस मिळवणे कठीण आहे. यासोबतच संतुलित आहार हा फिटनेसचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे नियमित व्यायामासोबतच योग्य आणि संतुलित आहार घेणेही तितकेच आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT