Shamonda virus in humans
नवी दिल्ली: फ्रान्समध्ये 'शामोंडा व्हायरस' या विषाणूचा मानवातील पहिला रुग्ण आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आणि फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बाधित व्यक्तीचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असून त्यांची रोगप्रतिकारशक्ती अत्यंत कमकुवत होती. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
हा विषाणू यापूर्वी केवळ प्राण्यांमध्ये आढळत होता. प्रामुख्याने गायी, म्हशी, मेंढ्या, शेळ्या आणि घोड्यांमध्ये याचा प्रादुर्भाव दिसून येत असे. हा विषाणू नेमका काय आहे आणि मानवांमध्ये याची कोणती लक्षणे दिसू शकतात, ते जाणून घ्या.
शामोंडा व्हायरस सर्वप्रथम १९६० च्या दशकात नायजेरियातील पाळीव प्राण्यांमध्ये आढळला होता. त्यानंतर आफ्रिका आणि आशियातील काही भागांत अधूनमधून विषाणुची लागण झालेल्या रूग्णांची नोंद झाली आहे. हा विषाणू 'श्मालनबर्ग व्हायरस'च्या कुळातीलच आहे. श्मालनबर्ग विषाणूमुळे प्राण्यांमध्ये प्रजननाशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होतात.
जागतिक प्राणी आरोग्य संघटनेच्या मते, हा विषाणू गायी-म्हशी, मेंढ्या, शेळ्या आणि अल्पाका (उंटासारखा दिसणारा प्राणी) या प्राण्यांना बाधित करतो. गरोदर प्राण्यांमध्ये संसर्ग झाल्यास गर्भपात होणे, मृत पिल्लू जन्माला येणे किंवा पिल्लांमध्ये जन्मजात व्यंग निर्माण होणे असे प्रकार घडतात. तसेच तीव्र संसर्ग असल्यास प्राण्यांना तीव्र ताप येणे, अतिसार, भूक न लागणे आणि दुधाच्या उत्पादनात अचानक मोठी घट होणे, अशी लक्षणे दिसतात.
मानवामध्ये या संसर्गाची ही पहिलीच नोंद असल्याने, माणसांवर या विषाणूचा नेमका कसा परिणाम होतो, याबद्दल सध्या मर्यादित माहिती उपलब्ध आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते, हा संसर्ग डासांसारख्या लहान कीटकांद्वारे माणसांपर्यंत पोहोचतो. हे कीटक बाधित प्राण्याला चावल्यानंतर विषाणूचे वाहक बनतात आणि त्यानंतर माणसाला चावल्यास हा आजार पसरू शकतो. हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे (माणसाकडून माणसाला) पसरत असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. बाधित प्राण्यांना स्पर्श केल्याने, त्यांची काळजी घेतल्याने किंवा त्यांच्या संपर्कात आल्याने हा विषाणू पसरत नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, बाधित व्यक्ती अशा भागात होती जिथे प्राण्यांमध्ये शामोंडा व्हायरसचा प्रादुर्भाव होता आणि तिथे 'क्युलिकोइड्स' प्रजातीचे कीटक मोठ्या प्रमाणावर होते. या संसर्गाची नेमकी कारणे आणि त्यापासून होणारे धोके समजून घेण्यासाठी वैज्ञानिक सध्या अधिक माहिती गोळा करत आहेत.