आपल्या आहारातून साखर पूर्णपणे काढून टाकल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम होतो, हे अनेक अभ्यासांनी सिद्ध झाले आहे. हार्वर्डसह अमेरिका आणि भारतातील अनेक आहारतज्ज्ञांनी यावर अभ्यास करून सांगितले आहे की जर एखादी व्यक्ती साखर खाणं बंद केलं, तर अगदी एका दिवसातच शरीरात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते. आणि जर हेच 30 दिवस सतत पाळले, तर याचा दिर्घकालीन परिणाम दिसून येतो.
अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर डॉ. मार्क हायमन यांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने साखर आणि मैदा आहारातून पूर्णपणे वगळला, तर केवळ 24 तासांत शरीरातील ब्लड शुगर नियंत्रणात येऊ लागते, अतिरिक्त पाणी बाहेर टाकलं जातं, साखरेची गरज भासणं कमी होतं आणि शरीरात सूजही कमी होण्यास मदत होते. हा बदल केवळ एक दिवसात सुरू होतो, ज्यामुळे व्यक्तीला थोड्याच वेळात ऊर्जा आणि चैतन्य जाणवू लागते.
तसेच, भारतीय मूळचे अमेरिकन डॉक्टर डॉ. सौरभ सेठी यांनी एका व्हिडिओद्वारे सांगितले आहे की जर तुम्ही 30 दिवस सलग साखर पूर्णपणे टाळली, तर तुमच्या शरीरात दीर्घकालीन आणि अधिक परिणामकारक बदल होतात. अशा व्यक्तीच्या यकृतातील चरबी कमी होऊ लागते, त्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या कमी होण्यास मदत होते. याशिवाय किडनीचे कार्य अधिक कार्यक्षम बनते, विशेषतः जेव्हा व्यक्ती इन्सुलिन रेसिस्टंट किंवा प्री-डायबेटिक असते. तेव्हा धमनींमध्ये असलेली सूजही हळूहळू कमी होते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
साखर टाळणं केवळ शरीरापुरतं मर्यादित राहत नाही, तर मानसिक स्पष्टतेसुद्धा याचा फायदा होतो. व्यक्ती अधिक लक्ष केंद्रित करू शकते, विचार करण्याची क्षमता वाढते. शिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढते कारण साखर श्वेत रक्त पेशींच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते. साखर सोडल्यावर शरीरात मॅग्नेशियम, झिंक आणि कॅल्शियमसारख्या महत्त्वाच्या खनिजांचे प्रमाण टिकवून ठेवणे शक्य होते, जे दीर्घकाळ आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असते.
अर्थात, सर्वांसाठी अचानक साखर सोडणं शक्य नसतं. त्यामुळे जर ती पूर्णपणे सोडता येत नसेल, तर मर्यादित प्रमाणात घेणं आवश्यक आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, पुरुषांनी दररोज 9 चमच्यांपेक्षा (सुमारे 36 ग्रॅम) जास्त साखर घेऊ नये, तर महिलांनी ही मर्यादा 6 चमच्यांपर्यंत (सुमारे 25 ग्रॅम) ठेवावी.
यामागील शास्त्रीय आधार आणि डॉक्टरांचे अनुभव पाहता, आपल्या दैनंदिन आहारातून साखर हळूहळू कमी करून संपूर्णपणे टाळल्यास शरीर आणि मन दोन्ही आरोग्यदायी बनू शकतात. मात्र, कोणताही मोठा आहार बदल करताना वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.