डायबिटीज असलेल्या रुग्णांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते. त्यांच्या आहारात शक्यतो जास्तीत जास्त आरोग्यदायी पदार्थ असावेत. जरी भाजीपाला सामान्यतः आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो, तरी काही विशिष्ट भाज्या अशा आहेत, ज्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतात. चला जाणून घेऊया अशा ४ भाज्यांविषयी, ज्या मधुमेह असलेल्या व्यक्तींनी टाळाव्यात किंवा अत्यंत मर्यादित प्रमाणात खाव्यात.
बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच जास्त असतो आणि त्यामध्ये स्टार्चही भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळे बटाटा खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर वाढते. पचन सुलभ असल्यामुळे ग्लुकोजही रक्तात झपाट्याने मिसळतो आणि त्यामुळे शुगर वाढते. त्यामुळे बटाट्याचा वापर मधुमेह रुग्णांनी टाळावा.
स्वीट कॉर्नचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो, पण त्यात कार्बोहायड्रेट्स खूप असतात. यामुळे अधिक प्रमाणात सेवन केल्यास ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे स्वीट कॉर्न खाणे सीमित ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
रताळं पोषक तत्वांनी भरलेले असले तरी मधुमेह रुग्णांसाठी ते त्रासदायक ठरू शकते. यामध्येही कार्ब्स आणि ग्लायसेमिक इंडेक्स दोन्ही जास्त आहेत, जे रक्तातील साखर झपाट्याने वाढवू शकतात.
सुरण खाल्ल्यानेही शुगर लेव्हलमध्ये अचानक वाढ होऊ शकते. याचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असला तरी जास्त प्रमाणात खाल्ल्यास परिणाम गंभीर होऊ शकतो. त्यामुळे याचे सेवन मर्यादित ठेवावे.
ज्या भाज्यांमध्ये कमी स्टार्च आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे अशा भाज्या, जसे की पालक, मेथी, भेंडी, दुधी यांचा समावेश आहारात करावा. या भाज्यांमध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात, जे शुगर नियंत्रणात ठेवतात आणि एकंदर आरोग्यही सुधारतात.