तोंडाचे आरोग्य बिघडले तर फक्त दातांचेच नाही, तर मेंदूचेही नुकसान होऊ शकते. एका नवीन संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तोंडात संसर्ग (Oral Infections) असणे म्हणजे दातांमधील किड आणि हिरड्यांचा दाह हे दोन्ही एकाचवेळी होते तेव्हा स्ट्रोकचा (Stroke) धोका लक्षणीयरीत्या वाढतो, असे नवीन अभ्यासातून समोर आले आहे.
उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे स्ट्रोकचे धोके आहेत हे आपल्याला माहिती आहेत. पण नवीन संशोधनानुसार शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, अनेकदा दुर्लक्ष केले जाणारे तोंडाचे आरोग्य देखील स्ट्रोक होण्यामध्ये मोठी भूमिका बजावू शकतात.
'न्यूरोलॉजी' (Neurology) नावाच्या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या नवीन अभ्यासानुसार, ज्या लोकांना हिरड्यांचा दाह (Gum Inflammation) आणि दातांची किड हे दोन्ही त्रास आहेत, त्यांना निरोगी तोंड असलेल्या लोकांपेक्षा ८६% जास्त स्ट्रोकचा धोका असतो.
या अभ्यासात दातांच्या दोन समस्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. दातांची किड (Cavities): ॲसिड निर्माण करणारे जीवाणू (Bacteria) दाताचे आवरण (Enamel) नष्ट करतात, ज्यामुळे ही किड लागते. हिरड्यांचे रोग (Periodontal Disease): ही एक जुनी दाहक (Chronic Inflammatory) स्थिती आहे, जी जीवाणूंच्या प्लेकमुळे (Bacterial Plaque Biofilm) हिरड्यांना आणि दातांना आधार देणाऱ्या संरचनेला हानी पोहोचवते.
युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅरोलिनाच्या (University of South Carolina) नेतृत्वाखालील या संशोधकांनी सुमारे 6 हजार (6000) मध्यमवयीन प्रौढांच्या डेटाचे विश्लेषण केले, ज्यांना यापूर्वी कधीही स्ट्रोक आला नव्हता. दंत तपासणीनंतर सहभागींना तीन गटांमध्ये विभागले गेले. निरोगी तोंडाची स्थिती, फक्त हिरड्यांचे रोग आणि हिरड्यांचे रोग, दातांची किड या दोन्हीने त्रस्त असणारे व्यक्ती. या सहभागींचा अनेक वर्षांपासून मागोवा घेण्यात आला. त्यांच्यामध्ये निरोगी दात असलेल्यांमध्ये: ४%, फक्त हिरड्यांचे रोग असलेल्यांमध्ये: ७% तर हिरड्यांचे रोग आणि किड दोन्ही असलेल्यांमध्ये: १०%स्ट्रोक येण्याचे प्रमाण दिसून आले. या निष्कर्षांवरून स्पष्ट होते की, या दोन्ही दातांच्या समस्या एकत्रितपणे असल्यामुळे स्ट्रोकचा धोका केवळ एका समस्येपेक्षा कितीतरी पटीने वाढतो.
संशोधकांना विश्वास आहे की, तोंडातील जीवाणू आणि त्यांचे विषारी घटक रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात. यामुळे शरीरात दीर्घकाळ दाह (Chronic Inflammation) होतो. त्यातून रक्त गोठण्यास (Clot formation) हातभार लागतो, ज्यामुळे मेंदूकडील रक्तप्रवाह अवरुद्ध होतो. हाच इश्चेमिक स्ट्रोकचे (Ischemic Stroke) मुख्य कारण आहे.
या अभ्यासात एक दिलासादायक गोष्टही समोर आली आहे. जे सहभागी नियमीतपणे दंत तपासणी (Professional Dental Care) करून घेत होते, त्यांना किड आणि हिरड्यांचे रोग या दोन्ही समस्या होण्याची शक्यता ८१% कमी होती. संशोधकांनी स्पष्ट केले की, हिरड्यांचे रोग आणि दातांची किड यांचा एकत्र असलेला धोका इश्चेमिक स्ट्रोकच्या वाढीव धोक्याशी स्वतंत्रपणे जोडलेला आहे. नियमित दंत तपासणीमुळे तोंडाचे आरोग्य सुधारून हा धोका कमी होऊ शकतो, त्यामुळे संशोधकांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.