डॉ. प्राजक्ता पाटील
कार्यालयीन कामात संगणकासमोर किंवा खुर्चीवर तासन्तास बसून राहणे ही आजकाल बहुतेक नोकरदारांची गरज बनली आहे; परंतु यामुळे शरीराच्या हाडांची रचना बदलत चालली आहे, असे संशोधन सांगते. दिवसभर खुर्चीवर बसून राहणे आता केवळ थकवा किंवा अंगदुखीचे कारण नाही, तर हे शरीराच्या बनावटीत बदल घडवणारे ‘सायलेंट डिसीज’ ठरत आहे. वैद्यकीय भाषेत याला ‘ऑफिस चेअर सिंड्रोम’ असे म्हणतात.
दीर्घकाळ बसून राहिल्याने मणक्यांवर, पाठीवर, खांद्यांवर, कुल्ह्यांवर आणि पायांच्या हाडांवर सतत दाब पडतो. यामुळे नैसर्गिक स्थिती बिघडते, स्नायूंचे संतुलन ढासळते आणि अलाईनमेंट विस्कळीत होते. सुरुवातीला हा त्रास अंगदुखी, पाठदुखी किंवा थोड्याफार अस्वस्थतेच्या स्वरूपात दिसतो, पण हळूहळू यामुळे स्पायनल डिस्कची हानी, स्लीप डिस्क किंवा बोन डेन्सिटी कमी होण्यासारखे गंभीर विकार उद्भवू शकतात. शरीरावर होणार्या या परिणामांचे सर्वाधिक भोग स्नायूंना व हाडांना करावे लागतात. सतत बसून राहिल्यामुळे रक्ताभिसरण मंदावते. त्यामुळे नसांमध्ये सूज येते, व्हेरीकोज व्हेन्सचा धोका वाढतो. हाडांवर अखंड दबाव पडल्याने त्यांची मजबुती कमी होते. दीर्घकाळात ऑस्टिओपोरोसिससारखा आजार उद्भवतो.
कमी हालचालीमुळे कॅलरी बर्निंग घटते, वजन वाढते, डायबेटीस व हृदयविकारासारखे आजार जडतात. विशेषत: तरुणांमध्ये याचा परिणाम लवकर दिसतो. शरीराचे काही भाग सतत दाबाखाली राहिल्यामुळे नैसर्गिक आकार बदलू लागतो. मणका सरळ राहण्याऐवजी वाकतो, पाठीचे स्नायू अशक्त होतात. याचा थेट परिणाम गुडघे, कुल्हे व मांड्यांवर होतो. परिणामी, वयाच्या तुलनेत लवकर हाडे झिजतात आणि सांध्यांचे विकार उद्भवतात.