Monsoon Care Tips
पावसाळ्यातील आजार आणि उपचार File Photo
आरोग्य

Monsoon Care Tips|निष्काळजीपणामुळे होतात हे पावसाळ्यातील आजार

पुढारी वृत्तसेवा

डॉ. सुनीलकुमार जाधव

पावसाळा हा सृष्टीच्या सृजनाचा काळ आहे. त्याचबरोबर तो अनेक आजारांना आपल्यासोबत घेऊन येणारा ऋतू म्हणूनही हल्ली ओळखला जात आहे. अर्थात, याला कारणीभूत मानवी निष्काळजीपणा आहे.

या काळात आरोग्याबाबत, आहार-विहाराबाबत पथ्य न बाळगल्यास हमखास काही आजारांचा सामना करावा लागू शकतो. जीवाणू, विषाणूजन्य आजारांचा संसर्ग अनेकांना होतो. याबाबतची कारणे बरेचदा माहीत नसतात किंवा माहिती असूनही, हलगर्जीपणामुळे या संसर्गाची लागण होते.

कावीळ :

पावसाळ्यामध्ये नद्यांना येणारे पूर नित्याचे असतात; पण यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित होते. असे दूषित पाणी प्यायल्याने काविळीसारख्या आजारांची लागण होते. दूषित पाण्याबरोबरच कापून ठेवलेली फळे, शिळे अन्न सेवन केल्यासही कावीळ होऊ शकते. तसेच डास, माश्या आणि काही जीवाणूंची वाढ होत असल्यास, काविळीचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो. यावर उपाय म्हणजे पाणी गाळून, उकळून, थंड करून प्यावे. तसेच फळे, भाज्या स्वच्छ धुवून मगच सेवन कराव्यात. शक्यतो ताज्या भाज्या व फळे सेवन करावीत. जेवणही ताजे करावे. उघड्यावरची फळे, खाद्यपदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे. थोडी सावधगिरी बाळगल्यास काविळीला प्रतिबंध करू शकतो.

अतिसार:

स्वच्छतेचा अभाव आणि दूषित पाण्याच्या सेवनामुळे अतिसार होऊ शकतो. अतिसारात मळमळ, उलट्या आणि जुलाबदेखील होऊ शकतात. आहारात दूषित मच्छीचे सेवन केल्यासही अतिसाराचा फैलाव होतो. त्यामुळे पावसाळ्यात कच्चे पदार्थ खाण्याऐवजी पूर्ण शिजवलेले अन्न सेवन करावे. स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायला हवे. अतिसार झाल्यास ओआरएसचे द्रावण प्यावे. तसेच आहारात हलके, सूपसारखे पदार्थ घ्यावेत. प्रदूषित पाण्यामध्ये निर्माण झालेल्या जीवाणूंमुळे अतिसार होतो. हे जीवाणू अन्नाला दूषित कतात. अशा अन्नाचे सेवन केल्याने आतडे, जठर यांचे आरोग्य बिघडून मग व्यक्तीला अतिसाराला सामोरे जावे लागते. यामध्ये सतत शौचाला जावे लागते. अतिसारात रुग्णाच्या शरीरातले पाणी कमी होते. त्यासाठी रुग्णाला लिंबू पाणी, ओआरएसचे द्रावण, ताक आदी तरला पेयांचे सेवन करावे; अन्यथा रुग्णाची अवस्था गंभीर होऊ शकते.

आर्सेनिकोसिस:

आर्सेनिक हे एक प्रकारचे रसायन आहे. ते नैसर्गिकरीत्याच पाण्यात मिसळलेले असते. दीर्घ काळ पाणी साठवून ठेवल्यास त्यात आर्सेनिकचे प्रमाण वाढते. ताज्या पाण्यात हे प्रमाण फार कमी असते. आर्सेनिक हा विषारी घटक आहे, जो मानवी शरीरासाठी हानिकारक असतो. जास्त काळ साठवलेले पाणी सतत प्यायल्यास त्वचेचा रंग बदलू लागतो. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब आणि प्रजननासंबंधीचे आजार होण्याचा धोका वाढतो, असेही काही अभ्यासांमधून आढळले आहे. त्यामुळे ताजे, स्वच्छ पाणी पिण्यावर भर द्यावा.

टॉयफॉईड :

हा आजार देखील प्रदूषित पाण्याच्या सेवनातून होतो. दूषित पाण्यातले जीवाणू आपल्या शरीरातल्या आतडे व रक्तात प्रवेश करतात. त्यामुळे हा आजार होतो. टायफॉईडमध्ये तीव्र ताप, अस्वस्थता, डोकेदुखी, बद्धकोष्ठता तसेच छातीवर लाल चट्टे निर्माण होतात. अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरची भेट घेऊन रक्ततपासणी करावी. तसेच डॉक्टरी सल्ल्याने औषधे सुरू करावीत.

हेपटायटिस:

प्रदूषित पाणी आणि असंतुलित आहार सेवन केल्यामुळे यकृताला सूज येते. त्यामुळे रुग्णाला भूक लागत नाही. मळमळते तसेच शारीरिक अशक्तपणा जाणवतो. तसेच खूप जास्त ताप येतो. हेपटायटिस ए व ई हे संसर्गजन्य आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधांचे सेवन या आजारात केल्यास आजार आटोक्यात येतो.

SCROLL FOR NEXT