डॉ. प्राजक्ता पाटील
अलीकडेच एक बातमी समोर आली होती. त्यानुसार, एका 18 वर्षांच्या विद्यार्थिनीला पाय आणि मांडीमध्ये तीव्र वेदना जाणवत होत्या. तपासणीदरम्यान समजले की, घरात पूजा असल्यामुळे तीन दिवसांपासून ती पाळी थांबवणार्या गोळ्या घेत होती. तिच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तगाठी (डीप वेन थ्रोम्बोसिस) झाल्या होत्या. डॉक्टरांनी सांगितले की तिला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे, पण तिच्या पालकांनी सुरुवातीला नकार दिला. त्याच रात्री उशिरा तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे पुन्हा रुग्णालयात आणले गेले; पण काही मिनिटांतच तिचा मृत्यू झाला. ही अतिशय धक्कादायक घटना होती. त्यामुळे कोणत्याही मुलीने किंवा स्त्रीने डॉक्टरांचा सल्ला न घेता पाळी थांबवणार्या गोळ्या कधीही घेऊ नयेत.
आजकाल अनेक स्त्रिया हार्मोनल गोळ्यांचा वापर पाळी उशिरा आणण्यासाठी किंवा मासिक पाळीच्या इतर त्रासांवर उपाय म्हणून करतात. या गोळ्या शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण बदलतात आणि त्यामुळे मासिक पाळीच्या पॅटर्नमध्ये बदल होतो. पण यामुळे रक्त घट्ट होण्याची शक्यता असते. रक्त घट्ट झाल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये थ्रोम्बस म्हणजेच रक्तगाठी तयार होतात.
या गाठींमुळे रक्तप्रवाह अडतो. जर या गाठी फुटून फुफ्फुसांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकल्या तर त्याला पल्मनरी एम्बोलिझम म्हणतात. ही अवस्था अचानक हृदय थांबणे किंवा मृत्यू यास कारणीभूत ठरू शकते. म्हणूनच हार्मोनल गोळ्या स्वतःहून कधीही घेऊ नयेत.
योग्य औषध आणि योग्य डोस फक्त डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ठरवला पाहिजे. ज्या महिला थेट केमिस्टकडून औषधे घेतात किंवा स्वतःहून उपचार सुरू करतात त्यांना गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे आरोग्याबाबत सजग राहा आणि अशा औषधांचा वापर नेहमी तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच करा.