Massage gun file photo
आरोग्य

Health Tips: शरीराच्या 'या' नाजूक अवयवांवर मसाज गन कधीच वापरू नका; डॉक्टरांचा इशारा

व्यायाम किंवा कष्टाच्या कामानंतर स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी आजकाल 'मसाज गन'चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Massage gun

व्यायाम किंवा कष्टाच्या कामानंतर स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी आजकाल 'मसाज गन'चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, हाच आराम आता तुमच्या डोळ्यांसाठी घातक ठरू शकतो, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. चेहऱ्यावर आणि डोळ्यांच्या आजूबाजूला मसाज गनचा वापर केल्याने अंधत्व येण्याचा किंवा डोळ्यांना गंभीर इजा होण्याचा धोका असतो.

'ब्रिटिश मेडिकल जर्नल' मधील एका अहवालानुसार, अनेक नागरिक डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी किंवा चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी 'मसाज गन'चा वापर करत असल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांच्या मते, मसाज गन हे पाठ, खांदे आणि मांड्यांसारख्या मोठ्या आणि मजबूत स्नायूंसाठी तयार करण्यात आलेले आहे, नाजूक चेहऱ्यासाठी नाही. या उपकरणातून निघणारी तीव्र कंपने आणि दाब चेहऱ्याच्या मऊ पेशींमधून थेट डोळ्यांपर्यंत पोहोचतात. यामुळे डोळ्यांच्या आतील नाजूक भागांना गंभीर इजा होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये रुग्णांच्या डोळ्यातील पडदा फाटणे, डोळ्याच्या आत रक्तस्राव होणे आणि दृष्टी कायमची धूसर होणे अशा गंभीर समस्या उद्भवल्या आहेत.

अनेक जण मसाज गनला पूर्णपणे सुरक्षित समजतात आणि शरीराच्या कोणत्याही भागावर त्याचा सर्रास वापर करतात. याच अनभिज्ञतेमुळे धोक्याची पातळी अधिक वाढली असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

आजकाल सोशल मीडियावरील विविध 'ब्युटी ट्रेंड्स' पाहून डोळ्यांखालील सूज किंवा काळी वर्तुळे कमी करण्यासाठी अनेक जण मसाज गनचा वापर चेहऱ्यावर करत आहेत. परंतु, यामुळे डोळ्यांमधील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या फुटून अंतर्गत रक्तस्राव होण्याचा मोठा धोका असतो, याची कल्पना युजर्सना नसते. एका उपकरणाचा चुकीचा वापर आरोग्यासाठी किती महाग ठरू शकते, याचे हे उदाहरण आहे.

काय काळजी घ्यावी?

मसाज गनचा वापर डोळे, कपाळ किंवा कानशिलाच्या भागावर कधीही करू नका. चेहऱ्यासाठी हे उपकरण पूर्णपणे वर्ज्य आहे.

याचा वापर केवळ पाठ, खांदे आणि पायांच्या मोठ्या स्नायूंवरच करावा. चेहऱ्याच्या त्वचेसाठी आवश्यक असल्यास डॉक्टरांनी प्रमाणित केलेली सौम्य ब्युटी टूल्स वापरावीत.

डोळ्यांच्या आसपास दुखत असल्यास किंवा सूज आल्यास मसाज गनने शेक देण्याऐवजी त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT