Cancer File Photo
आरोग्य

Cancer: पाठदुखीला वाढत्या वयामुळे समजू नका; ठरू शकते कॅन्सरचे पहिले लक्षण!

सततची पाठदुखी ही वाढत्या वयाचा परिणाम असल्याचे समजून दुर्लक्ष करणे ५७ वर्षीय एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले.

पुढारी वृत्तसेवा

Cancer

नवी दिल्ली : सततची पाठदुखी ही वाढत्या वयाचा परिणाम असल्याचे समजून दुर्लक्ष करणे ५७ वर्षीय एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. सुरुवातीला साधी दुखापत किंवा वयामुळे पाठदुखी होत असल्याचे त्यांना वाटत होते. मात्र, त्यासोबत जाणवणारी दुहेरी दृष्टी ही लक्षणे एका गंभीर आजाराची सुरुवात असल्याचे नंतर स्पष्ट झाले. डॉक्टरांच्या तपासणीत जेसन यांना स्टेज-३ मल्टिपल मायलोमा या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले.

लँकेशायर येथील ५७ वर्षीय जेसन वॉकर यांचा स्वतःचा पेंटिंगचा व्यवसाय आहे. गेल्या काही काळापासून त्यांना पाठदुखीचा त्रास होत होता. वय वाढत असल्यामुळे हा त्रास होत असावा, असे त्यांना वाटले. त्याचवेळी त्यांना दुहेरी दिसण्याची समस्याही जाणवत होती. मात्र, या दोन्ही लक्षणांचा एकमेकांशी संबंध असू शकतो, याची त्यांना कल्पना नव्हती.

तपासणीत धक्कादायक वास्तव

मात्र, वेदना आणि त्रास असह्य झाल्यावर त्यांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली. फेब्रुवारी २०१४ मध्ये डॉक्टरांनी त्यांना ‘स्टेज ३ मल्टीपल मायलोमा’ या रक्ताच्या कर्करोगाचे निदान केले. हा कर्करोग हाडांच्या मज्जासंस्थेतील (बोन मॅरो) प्लाझ्मा पेशींवर परिणाम करतो. तपासणीत हा कर्करोग त्यांच्या शरीरभर पसरल्याचे आणि विशेषतः कंबर व ओटीपोटाच्या हाडांमध्ये तीव्र वेदना निर्माण करत असल्याचे समोर आले. या आजारामुळे त्यांच्या पियुषिका ग्रंथीवर (पिट्युटरी ग्लँड) आणि दृष्टीच्या नसांवर ताण येऊन त्यांना दुहेरी दिसण्याचा त्रास होत होता.

मल्टिपल मायलोमा म्हणजे काय?

मल्टिपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींमध्ये होणारा कर्करोग आहे. या पेशी पांढऱ्या रक्तपेशींचा एक प्रकार असून शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेसाठी आवश्यक असलेल्या अँटिबॉडीज तयार करण्याचे काम करतात. मात्र, या पेशींमध्ये असामान्य वाढ झाल्यास त्या अस्थिमज्जेत मोठ्या प्रमाणात वाढू लागतात आणि निरोगी रक्तपेशींच्या निर्मितीत अडथळा निर्माण करतात.

या आजारामुळे हाडे कमकुवत होऊन हाडदुखी, हाडांना फ्रॅक्चर होणे आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. सततचा थकवा, वारंवार होणारे संसर्ग, रक्ताची कमतरता आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्याही काही रुग्णांमध्ये दिसून येतात. रुग्णाचे वय, एकूण आरोग्य आणि कर्करोगाचे स्वरूप यानुसार उपचार ठरवले जातात. यामध्ये केमोथेरपी, लक्ष्यित औषधे, इम्युनोथेरपी, स्टेरॉइड्स तसेच स्टेम सेल प्रत्यारोपणाचा समावेश होऊ शकतो.

उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका

जेसन यांनी केमोथेरपी घेतली. मात्र, उपचार पूर्ण केल्यानंतर काही काळातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर दोन वेळा यशस्वी स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी पूर्वीच्या अनेक गोष्टी पुन्हा सुरू केल्या. मात्र, डॉक्टरांनी त्यांना हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले.

पाच वर्षांनंतर पुन्हा कर्करोगाचे निदान

सुमारे पाच वर्षे कर्करोग नियंत्रणात राहिल्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये जेसन यांच्या डोक्यावर काही असामान्य, मऊसर गाठी दिसू लागल्या. तपासणीनंतर कर्करोग पुन्हा परतल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तीन औषधांच्या संयोजनाने करण्यात येणारा उपचार त्यांना सहन होणे कठीण झाले. त्यामुळे त्यांना मँचेस्टर येथील द क्रिस्टी रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे सुरू असलेल्या TOPICAL या वैद्यकीय चाचणीत सहभागी होणारे ते पहिले रुग्ण ठरले. या चाचणीत POLB 001 या दाहविरोधी औषधाचा अभ्यास केला जात आहे. इम्युनोथेरपीमुळे होणारे गंभीर दुष्परिणाम कमी करण्यासाठी हे औषध कितपत उपयुक्त ठरते, याचा संशोधक अभ्यास करत आहेत.

पाठदुखीकडे कधी गांभीर्याने पाहावे?

बहुतांश वेळा पाठदुखीचे कारण कर्करोग नसते. स्नायूंवर आलेला ताण, चुकीची बैठक किंवा किरकोळ दुखापत यामुळेही पाठदुखी होऊ शकते. मात्र, पाठदुखी सतत राहणे, हळूहळू वाढत जाणे, त्यामागचे कारण स्पष्ट नसणे किंवा त्यासोबत इतर असामान्य लक्षणे दिसणे, अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अचानक वजन कमी होणे, सततचा थकवा, ताप, रात्री वाढणारी वेदना, हात-पायांमध्ये अशक्तपणा किंवा बधिरपणा, लघवी अथवा शौचावर नियंत्रणात बदल यांसारखी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT