भारतीय घरांमध्ये रात्रीच्या जेवणानंतर कणीक (आटा) शिल्लक राहणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. अनेक गृहिणी दुसऱ्या दिवशी सकाळी वेळ वाचवण्यासाठी ही उरलेली कणीक लगेच फ्रिजमध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी तिची पोळी किंवा चपाती बनवतात. मात्र, शिळ्या कणकेचा वापर करणे आरोग्यासाठी खरंच किती सुरक्षित आहे, याबाबत अनेक मतभेद आहेत. तज्ज्ञांच्या मते, शिळ्या कणकेचा वापर काही विशिष्ट वेळेपर्यंत आणि योग्य काळजी घेऊनच करणे महत्त्वाचे आहे.
रात्रीची उरलेली कणीक वापरणे किती सुरक्षित?
एक्सपर्ट्स आणि आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कणिक तयार झाल्यावर ती 8 ते 12 तासांपर्यंत फ्रिजमध्ये सुरक्षितपणे ठेवता येते आणि वापरता येते. जर कणीक २४ तासांपेक्षा जास्त जुनी असेल, तर ती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
शिळी कणीक वापरताना होणारे आरोग्य धोके:
फ्रिजमधील थंड तापमान कणकेमधील बॅक्टेरियाची (जीवाणू) वाढ पूर्णपणे थांबवत नाही, तर केवळ धीमे करते. त्यामुळे जास्त काळ कणीक ठेवल्यास खालीलप्रमाणे समस्या उद्भवू शकतात:
बॅक्टेरियल वाढ: कणकेमध्ये ओलावा आणि कर्बोदके (Carbohydrates) असतात, जे बॅक्टेरिया आणि यीस्ट वाढीसाठी अनुकूल ठरतात. जास्त काळ ठेवल्यास, त्यात हानिकारक बॅक्टेरिया विकसित होऊ शकतात, ज्यामुळे अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढतो.
पचनाच्या समस्या: शिळी कणीक पचायला जड होते. त्यामुळे पोटदुखी, गॅस आणि ॲसिडिटी यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
पोषक घटकांचे नुकसान: कणीक जास्त वेळ ठेवल्यास त्यातील काही पोषक घटक आणि जीवनसत्त्वे कमी होण्याची शक्यता असते.
किण्वन (Fermentation): कणीक आंबते, ज्यामुळे त्याचा नैसर्गिक वास आणि चव बदलते.
कणीक वापरण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा:
जर तुम्ही रात्रीची उरलेली कणीक वापरणार असाल, तर ती सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यासाठी खालीलप्रमाणे 'संकेत' तपासा:
वास (Smell): कणकेतून आंबट, विचित्र किंवा तीव्र वास येत असेल, तर ती त्वरित फेकून द्या. ताजी कणीक गंधहीन असते.
रंग (Colour): कणकेचा रंग बदलला असेल किंवा त्यावर काळसर/हिरवट बुरशीचे डाग दिसत असतील, तर ती वापरू नका.
चव (Taste): शिजवल्यानंतरही पोळीची चव 'शिळी' किंवा आंबट वाटत असेल, तर ती कणीक चांगली नव्हती.
पोत (Texture): कणीक खूप चिकट किंवा कोरडी झाली असेल, तर ती खराब झाली आहे.
कणीक सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स:
कणीक मळताना थोडे तेल लावा.
कणीक एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा प्लॅस्टिक रॅपमध्ये गुंडाळून ठेवा.
कणीक नेहमी फ्रिजच्या थंड भागात ठेवा.
8 ते 10 तासांच्या आत तिचा वापर करण्याचा प्रयत्न करा.