"लवकर निजे, लवकर उठे, त्याला विद्या आणि आरोग्य लाभे" ही जुनी म्हण आजही किती खरी आहे, हे आधुनिक संशोधनांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. झोपेच्या वेळेचा आणि दर्जाचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. सतत झोपेचा तक्ता बदलणं किंवा उशिरा झोपणं, ही सवय अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. अलीकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, झोपेचा अनियमित पॅटर्न असलेल्या लोकांमध्ये टाईप-2 डायबिटीजचा धोका ३४% अधिक आढळून आला आहे.
अमेरिकेतील ब्रिघम अँड विमेन्स हॉस्पिटल, बोस्टन येथे करण्यात आलेल्या एका विस्तृत अभ्यासात, सात रात्रींच्या झोपेचा पॅटर्न रेकॉर्ड करण्यात आला आणि त्यानंतर सहभागी व्यक्तींना ७ वर्षांपेक्षा अधिक काळ निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. यामध्ये असे लक्षात आले की, ज्या लोकांची झोपेची वेळ सातत्याने बदलत होती, त्यांच्यामध्ये मधुमेहाचा धोका लक्षणीयरीत्या वाढलेला होता.
झोपेचा नियमित वेळ म्हणजे दररोज जवळपास एकाच वेळी झोपणे आणि उठणे. अशा वेळापत्रकामुळे शरीराची जैविक घड्याळ सुरळीत चालते, जे संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. झोपेतील बिघाडामुळे इन्सुलिन रेग्युलेशनवर परिणाम होतो आणि यामुळे मधुमेहाच्या धोक्याचा उगम होतो.
सध्या जगभरात सुमारे 1 अब्ज लोक टाईप-2 मधुमेहाने ग्रस्त आहेत. ही आजाराची तीव्रता २०५० पर्यंत दुप्पट होऊन १.३ अब्जांवर जाण्याचा अंदाज आहे. मधुमेह हा केवळ एक आजार नसून मृत्यू आणि अपंगत्वाची प्रमुख कारणं ठरते.
आजारांपासून दूर राहण्यासाठी फक्त आहार आणि व्यायाम नव्हे, तर नियमित झोपेचा दिनक्रम पाळणं अत्यावश्यक आहे. केवळ ७-८ तासांची पुरेशी झोप नाही, तर ती एकसंध आणि वेळेवर असणं तितकंच महत्त्वाचं आहे.