HPV vaccination Cervical Cancer symptoms prevention  file photo
आरोग्य

HPV vaccination: १४ वर्षांच्या मुलींना आता मोफत मिळणार HPV लस; गर्भाशयाचा कर्करोग म्हणजे काय?

Cervical Cancer symptoms prevention: देशात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. हे वाढते धोके लक्षात घेता, केंद्र सरकार लवकरच देशभरातील १४ वर्षांच्या मुलींसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू करणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

HPV vaccination Cervical Cancer symptoms prevention

नवी दिल्ली: महिलांच्या आरोग्याबाबत केंद्र सरकारने अत्यंत ठोस पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. देशात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे (सर्वाइकल कॅन्सर) प्रमाण वेगाने वाढत आहे. हे वाढते धोके लक्षात घेता, केंद्र सरकार लवकरच देशभरातील १४ वर्षांच्या मुलींसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेअंतर्गत मुलींना ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) प्रतिबंधक लस दिली जाईल, जी या कॅन्सरविरुद्ध सर्वात प्रभावी मानली जाते.

भारतात महिलांना होणाऱ्या कर्करोगामध्ये सर्वाइकल कॅन्सर हे एक मोठे आव्हान बनले आहे. आकडेवारीनुसार, भारतात महिलांमधील हा दुसरा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. दरवर्षी सुमारे १.२५ लाख महिलांना याची लागण होते, तर जवळपास ७५,००० महिलांना आपला जीव गमवावा लागतो. तज्ज्ञांच्या मते, जर कमी वयातच मुलींना ही लस मिळाली, तर भविष्यातील हा जीवघेणा धोका पूर्णपणे टाळता येऊ शकतो.

१४ वर्ष हेच वय का?

'इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, दरवर्षी १४ वर्षे पूर्ण करणाऱ्या सुमारे १.१५ कोटी मुलींना ही लस टोचली जाईल. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, १४ वर्षे हे वय लसीकरणासाठी सर्वात योग्य आहे, कारण या वयात लस घेतल्यास शरीरात दीर्घकाळ आणि सर्वाधिक रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते, असे पुरावे समोर आले आहेत.

नेमका काय आहे सर्वाइकल कॅन्सर?

स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मते, हा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आहे. मुख्यत्वे HPV विषाणूच्या संसर्गामुळे गर्भाशयाच्या पेशींमध्ये असामान्य बदल होतात आणि त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होते. असुरक्षित शारीरिक संबंध, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, धूम्रपान आणि अनुवांशिक कारणांमुळे हा धोका वाढतो. हा आजार हळूहळू बळावतो, त्यामुळे सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?

  • सुरुवातीच्या काळात काही लक्षणे दिसतात, ज्यांना सामान्य समस्या समजून टाळले जाते:

  • मासिक पाळीच्या चक्राव्यतिरिक्त अंगावरून पांढरे पाणी जाणे (Vaginal Discharge).

  • दोन मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्त्राव किंवा स्पॉटिंग होणे.

  • शारीरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होणे.

  • रजोनिवृत्ती नंतरही रक्तस्त्राव होणे.

बचावासाठी काय कराल?

१. HPV ही लस कॅन्सर निर्माण करणाऱ्या विषाणूंपासून संरक्षण देते.

२. दर ३ ते ५ वर्षांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 'पॅप स्मीयर' आणि HPV टेस्ट करून घ्यावी. यामुळे कॅन्सर होण्यापूर्वीच पेशींमधील बदल ओळखता येतात.

३. सुरक्षित शारीरिक संबंधांचा अवलंब करा आणि कोणत्याही असामान्य लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.

वेळेत घेतलेला निर्णय आणि जागरूकता हेच या आजारावरील सर्वात मोठे शस्त्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT