

गळ्याच्या समोरील भागात असलेली थायरॉईड ग्रंथी शरीरातील चयापचय क्रिया आणि महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यासाठी आवश्यक हॉर्मोन्स तयार करते. विशेषतः गर्भधारणेच्या काळात शरीरात होणार्या बदलांमुळे आई आणि गर्भस्थ बाळ या दोघांनाही थायरॉईड हॉर्मोनची गरज जास्त भासते.
गर्भार काळात होणारे असंतुलन बाळाच्या मानसिक विकासावर गंभीर परिणाम करू शकते. हे असंतुलन दोन प्रकारचे असते. एक म्हणजे हॉर्मोन कमी होणे किंवा जास्त होणे. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. थायरॉईड हॉर्मोनच्या पातळीनुसार आईमध्ये अॅनिमिया, प्रचंड थकवा, सांधेदुखी, हृदयाचे ठोके वाढणे, उच्च रक्तदाब आणि प्रसूतीनंतर येणारे नैराश्य यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. हॉर्मोनच्या कमतरतेमुळे गर्भपात होणे, मुदतपूर्व प्रसूती किंवा जन्मतः बाळाचे वजन कमी असणे यांसारखे धोके वाढतात. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे बाळाच्या मेंदूचा विकास खुंटणे, शिकण्यामध्ये अडचणी येणे आणि बुद्ध्यांक कमी होणे अशा दीर्घकालीन समस्या निर्माण होऊ शकतात.
सुरुवातीच्या महिन्यांतील बदल
गर्भधारणेच्या पहिल्या 3 ते 4 महिन्यांत अनेकदा हायपर थायरॉइडिझमची लक्षणे दिसतात. या काळात प्रेग्नन्सी हॉर्मोन्सचे प्रमाण जास्त असल्याने थायरॉईड ग्रंथी अधिक कार्यक्षम होते. अनेकदा ही स्थिती आपोआप सुधारते, मात्र जुळी मुले असणे किंवा अतिप्रमाणात उलट्या होणे अशा स्थितीत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे अनिवार्य ठरते.
प्रसूतीनंतरचा थायरॉईडचा त्रास
बाळाच्या जन्मानंतर 12 महिन्यांच्या आत काही महिलांमध्ये थायरॉईडाइटिस ही समस्या उद्भवू शकते. ही एक ऑटोइम्यून सूज आहे. प्रसूतीनंतर तीव्र नैराश्य किंवा थकवा जाणवत असेल, तर थायरॉईडची चाचणी करणे आवश्यक आहे. ज्यांच्या कुटुंबात आधीपासून थायरॉईडचा इतिहास आहे, त्यांना याचा धोका अधिक असतो.
गर्भावस्थेतील थायरॉईडची समस्या वेळीच ओळखणे सोपे आणि स्वस्त आहे. रक्ताच्या चाचणीद्वारे हॉर्मोनची पातळी तपासून औषधांद्वारे ती नियंत्रित केली जाऊ शकते.
तसेच वैयक्तिक पातळीवर आहारात आयोडिनचे योग्य प्रमाण ठेवणे, रक्तातील टीएसएच पातळीची वेळोवेळी तपासणी करणे, डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणे या गोष्टी जपायला हव्यात. वेळेवर निदान आणि योग्य उपचारामुळे आई आणि बाळ या दोघांनाही भविष्यातील मोठ्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवता येते.