मुल होणे हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय असतो. पण हा निर्णय घेण्यापूर्वी शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी तयार असणे गरजेचे आहे. आजकाल अनेकजण करिअर, आर्थिक स्थैर्य आणि वैयक्तिक कारणांमुळे लग्नानंतर लगेच मूलबाळाचा विचार करत नाहीत. मात्र, उशिरा गर्भधारणा केल्यास काही आरोग्याच्या जोखमी वाढू शकतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, महिलांसाठी मूल होण्यासाठी २५ ते ३० वर्षे हे सर्वात योग्य वय मानले जाते. या वयात महिलांचे अंडोत्सर्जन (Ovulation) नियमित असते, अंडी (Eggs) उत्तम गुणवत्तेची असतात आणि गर्भधारणेची शक्यता जास्त असते.
३० वर्षांनंतर अंड्यांची संख्या कमी होऊ लागते.
३५ नंतर डाउन सिंड्रोमसारख्या क्रोमोसोमल समस्यांचा धोका वाढतो.
उशिरा गर्भधारणा केल्यास गर्भपाताचा धोका, प्रेग्नन्सीमध्ये मधुमेह किंवा उच्च रक्तदाब होण्याची शक्यता वाढते.
पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता ३० वर्षांपर्यंत उत्तम असते. ४० वर्षांनंतर शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता कमी होते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, पुरुषांनी ३० ते ३५ वर्षे या वयोगटात पितृत्वाचा विचार करावा. उशिरा पितृत्व स्वीकारल्यास गर्भधारणेस वेळ लागू शकतो आणि बाळामध्ये काही आनुवंशिक विकृतींचा धोका वाढतो.
अनेक जोडपी करिअर आणि आर्थिक स्थैर्य मिळवून मगच मुलाचा विचार करतात. यामुळे मुलासाठी चांगले शिक्षण, सुरक्षित वातावरण देणे सोपे जाते. पण दुसरीकडे आरोग्याशी संबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात. उशिरा गर्भधारणा केल्यास इनफर्टिलिटी ट्रीटमेंटची गरज भासू शकते, जी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या थकवणारी ठरू शकते.
लग्नानंतर काही वर्षे जोडीदारासोबत वेळ घालवा आणि मानसिक तयारी करा.
आर्थिक नियोजन करा मुलासाठी आवश्यक खर्च भागवण्याची क्षमता असणे महत्त्वाचे.
दोघांचे आरोग्य तपासा थायरॉईड, मधुमेह, हिमोग्लोबिन, जीवनसत्त्वांची पातळी तपासा.
स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या आवश्यक असल्यास प्री-कन्सेप्शन काउन्सेलिंग करून घ्या.
मुल होणे म्हणजे केवळ शारीरिक नाही तर मानसिक जबाबदारीही आहे. जोडप्याने तणाव हाताळण्याची क्षमता, परस्पर संवाद आणि सहकार्य याबाबत तयार असणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, महिलांसाठी २५-३० आणि पुरुषांसाठी ३०-३५ हे वय मुलासाठी सर्वात योग्य आहे. यानंतर गर्भधारणा कठीण होऊ शकते, पण वैद्यकीय मदतीने शक्य असते. त्यामुळे उशिरा पालकत्वाचा विचार करत असाल, तर तज्ञांचा सल्ला आणि आरोग्य तपासणी करणे अत्यावश्यक आहे.