प्रातिनिधिक छायाचित्र.  Pudhari News
आरोग्य

ICMR Report on Antibiotic Resistance : अँटिबायोटिक्सचा प्रभाव घटतोय? जिवाणूंमध्ये वाढत्या प्रतिरोधाबाबत ICMRचा गंभीर इशारा

ICMR Report on Antibiotic Resistance : नवीन अहवालात माहिती, प्रतिसाद देण्याची क्षमता प्रथम श्रेणीच्या रुग्णालयांमध्ये ३९.८ टक्के

पुढारी वृत्तसेवा

ICMR report on antibiotic resistance : प्रतिजैविक औषधांचा गैरवापर रोखण्यावर सरकारकडून भर दिला जात असतानाच, सामान्य जिवाणू संसर्गांवर वापरण्यात येणाऱ्या प्रतिजैविकांची परिणामकारकता कमी होत असल्याचे समोर आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) नव्या अहवालानुसार, रुग्णालयांमध्ये तपासण्यात आलेल्या 'ई. कोलाय' (E. coli) जिवाणूंच्या नमुन्यांपैकी केवळ १८.४ टक्के नमुनेच 'सेफोटॅक्झिम' या प्रतिजैविकास प्रतिसाद देत असल्याचे आढळून आले आहे. न्यूमोनिया आणि मूत्रमार्गाच्या संसर्गासारख्या गंभीर आजारांवर उपचारासाठी या प्रतिजैविकाचा वापर केला जातो.

केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयानेही व्‍यक्‍त केली होती चिंता

जागतिक प्रतिजैविक प्रतिरोध जनजागृती सप्ताहाच्या (१८ नोव्हेंबर) सुरुवातीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय होणारी प्रतिजैविकांची विक्री आणि अयोग्य पद्धतीने दिली जाणारी औषधे यांबाबत चिंता व्यक्त केली होती. यानंतर आता आसीएमआरच्‍या अहवालातही ही बाब पुन्‍हा एकदा अधोरेखित झाली आहे.

केवळ सुमारे एक तृतीयांश नमुन्‍यांनाच प्रतिसाद

आयसीएमआरच्या 'अँटिमिक्रॉबियल रेझिस्टन्स सर्व्हेलन्स अँड रिसर्च नेटवर्क'च्या २०२५ च्या वार्षिक अहवालात गंभीर संसर्गांवर वापरण्यात येणाऱ्या अधिक प्रभावी प्रतिजैविकांच्या बाबतीतही मोठ्या प्रमाणात प्रतिरोध आढळून आला आहे. इतर औषधांना दाद न देणाऱ्या गंभीर संसर्गांसाठी सहसा राखीव ठेवण्यात येणाऱ्या 'कार्बापेनेम्स' या शक्तिशाली प्रतिजैविकास 'क्लेब्सिएला न्यूमोनिया'च्या केवळ सुमारे एक तृतीयांश नमुन्यांनाच प्रतिसाद दिला.

९१.१ टक्के नमुन्यांमध्ये कार्बापेनेम्स प्रतिरोधक क्षमता

तपासण्यात आलेल्या 'ॲसिनेटोबॅक्टर बॉमानी' (Acinetobacter baumannii) या जिवाणूंच्या ९१.१ टक्के नमुन्यांमध्ये कार्बापेनेम्स प्रतिरोधक क्षमता दिसून आली आहे. अतिदक्षता विभागातील गंभीर रुग्णांमध्ये रुग्णालयामार्फत होणारे न्यूमोनिया आणि रक्तातील संसर्गासारखे गंभीर आजार या जिवाणूंमुळे होऊ शकतात.

आता अँटिबायोटिक्स औषधांचा वापर रुग्‍णालयांपुरता मर्यादित नाही

प्रतिजैविक प्रतिरोध हा केवळ मोठ्या संदर्भ रुग्णालयांपुरता मर्यादित राहिलेला नाही, असे आयसीएमआरच्या वर्णनात्मक संशोधन विभागाच्या प्रमुख डॉ. कामिनी वालिया यांनी स्पष्ट केले. दुय्यम स्तरावरील रुग्णालयांची आकडेवारी देत त्यांनी सांगितले की, 'ई. कोलाय' जिवाणूंची 'सेफ्ट्रियाझोन' या प्रतिजैविकास प्रतिसाद देण्याची क्षमता प्रथम श्रेणीच्या रुग्णालयांमध्ये ३९.८ टक्के, द्वितीय श्रेणीत २८ टक्के आणि तृतीय श्रेणीच्या रुग्णालयांमध्ये अवघी ११.५ टक्के इतकी घसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT