अनेक महिलांसाठी मासिक पाळीचे ते काही दिवस खूपच वेदनादायी असतात. काही वेळा हा त्रास इतका वाढतो की त्यामुळे रोजची कामं करणंही कठीण होऊन बसतं. अशा वेळी मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतात. मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या या वेदनांना वैद्यकीय भाषेत 'डिस्मेनोरिया' (Dysmenorrhea) असं म्हणतात.
सामान्यतः पाळीच्या दिवसांमध्ये पोटाच्या खालच्या भागात, कंबरेत किंवा मांड्यांमध्ये तीव्र वेदना जाणवतात. यासोबतच काही महिलांना डोकेदुखी, मळमळ आणि थकवा अशा समस्यांचाही सामना करावा लागतो. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय खूप फायदेशीर ठरू शकतात. या उपायांनी वेदनांपासून त्वरित आराम मिळू शकतो.
जर तुम्हाला मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम हवा असेल, तर बडीशेपचं पाणी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. हे पाणी तयार करण्यासाठी एक चमचा बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर सकाळी हे पाणी गाळून प्या. या उपायामुळे पोटात येणारी कळ कमी होते आणि मासिक पाळी नियमित होण्यासही मदत मिळते.
जर तुम्ही मासिक पाळीच्या त्रासाने त्रस्त असाल, तर तीळ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. याचं सेवन करण्यासाठी, १ ते २ चमचे तीळ घ्या आणि ते गुळामध्ये मिसळून त्याच्या लहान गोळ्या तयार करा. मासिक पाळी सुरू होण्याच्या २ ते ३ दिवस आधी आणि पाळी सुरू झाल्यावर दिवसातून १ ते २ वेळा या गोळ्यांचं सेवन करा.
तिळामध्ये असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स स्नायूंना आराम देतात, ज्यामुळे वेदना कमी होतात. तर गूळ शरीरातील लोहाची कमतरता भरून काढतो. चव वाढवण्यासाठी तुम्ही तीळ हलके भाजूनही खाऊ शकता, ज्यामुळे चवीसोबतच पचनक्रियाही सुधारेल.
जर तुम्ही मासिक पाळीच्या वेदनांनी हैराण असाल, तर त्वरित आराम मिळवण्यासाठी गरम टॉवेल किंवा हीटिंग पॅडची (Heating Pad) मदत घेऊ शकता. वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी टॉवेल किंवा हीटिंग पॅडला पोटावर आणि कंबरेच्या खालच्या भागावर १० ते १५ मिनिटांसाठी ठेवा.
उष्णतेमुळे त्या भागातील रक्ताभिसरण सुधारतं आणि स्नायूंना आलेला आखडलेपणा कमी होतो. यामुळे वेदनांपासून लगेचच आराम मिळतो. जर वेदना जास्त असतील, तर दिवसातून २ ते ३ वेळा हा उपाय करू शकता.