

पावसाळा हा उकाड्यापासून दिलासा देणारा आणि निसर्गाला प्रफुल्लित करणारा ऋतू असला तरी, तो सोबत अनेक आजारांनाही आमंत्रण देतो. या काळात वातावरणातील ओलावा आणि तापमानातील चढ-उतार यामुळे जिवाणू, विषाणू, बुरशी आणि डास यांची वाढ झपाट्याने होते. यामुळे पचनसंस्था कमजोर होते आणि सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार होण्याची शक्यता वाढते.
आजारी पडू नये यासाठी तुमची इम्युन सिस्टीम (रोगप्रतिकारशक्ती) मजबूत असणे आवश्यक आहे. चला तर मग, जाणून घेऊया अशा दोन खास काढ्यांची रेसिपी, जे तुम्हाला पावसाळ्यात निरोगी ठेवण्यास मदत करतील.
पबमेडमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी शरीराला पुरेशा पोषक तत्वांची गरज असते. यासाठी संतुलित आहार, पुरेसे पाणी, झिंक, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे आणि व्हिटॅमिन सी, डी आणि ई असलेले पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे. या काळात बाहेरचे आणि अनहेल्दी पदार्थ खाणे टाळावे. यासोबतच हळद, आले, तुळस यांसारख्या घरगुती गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमची इम्युनिटी वाढवू शकता.
हा काढा सर्दी, खोकला आणि घशातील खवखव दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
साहित्य:
आल्याचा छोटा तुकडा
५-६ तुळशीची पाने
४-५ काळी मिरी
दोन कप पाणी
ओल्या हळदीचा छोटा तुकडा
चवीसाठी: एक छोटा चमचा मध किंवा गुळाचा छोटा खडा
काढा बनवण्याची पद्धत:
एका भांड्यात पाणी घेऊन ते गॅसवर ठेवा.
त्यात आले ठेचून आणि तुळशीची पाने तोडून टाका.
ओली हळद किसून आणि काळी मिरी ठेचून पाण्यात घाला.
हे मिश्रण मंद आचेवर १० मिनिटे उकळू द्या, जेणेकरून पाणी अर्धे होईल.
काढा गाळून घ्या आणि थोडा वेळ थंड होऊ द्या.
तो कोमट झाल्यावर त्यात मध घालून प्या.
गुळवेल (Giloy) रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि तापावर नियंत्रण मिळवण्यासाठी ओळखली जाते.
साहित्य:
गुळवेलीचे ३-४ इंच लांबीचे दोन ते तीन तुकडे
अर्धा चमचा दालचिनी पावडर (किंवा छोटा तुकडा)
तीन ते चार तुळशीची पाने
दोन कप पाणी
लिंबाचा रस (आवडीनुसार)
काढा बनवण्याची पद्धत:
एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गुळवेल ठेचून घाला.
त्यात दालचिनी आणि तुळशीची पाने घालून मिश्रण मंद आचेवर १०-१५ मिनिटे शिजू द्या.
त्यानंतर काढा गाळून घ्या.
तो थोडा थंड झाल्यावर त्यात लिंबाचे काही थेंब टाका. हा काढा प्यायला चविष्ट लागतो आणि इम्युनिटी वाढवण्यासाठीही मदत करतो.
महत्त्वाची सूचना: तुम्हाला कोणतीही आरोग्य समस्या असल्यास, हे काढे पिण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तसेच, काढ्याच्या प्रमाणाकडे विशेष लक्ष द्या. जास्त प्रमाणात प्यायल्यास नुकसानही होऊ शकते.