Hemoglobin File Photo
आरोग्य

High Hemoglobin levels: रक्तातील हिमोग्लोबिन वाढणेही अत्यंत धोकादायक; पाहा ही मुख्य कारणे

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे जितके चिंतेचे मानले जाते, तितकेच ते आवश्यकतेपेक्षा जास्त असणे देखील आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. धोकादायक पातळी कशी ओळखावी? जाणून घ्या.

पुढारी वृत्तसेवा

High Hemoglobin levels

नवी दिल्ली: रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे जितके चिंतेचे मानले जाते, तितकेच ते आवश्यकतेपेक्षा जास्त असणे देखील आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढते म्हणजे तांबड्या रक्तपेशींचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होते किंवा रक्तद्रव्याचे प्रमाण कमी होते. हिमोग्लोबिन वाढणे हा स्वतःमध्ये एखादा आजार नसला, तरी ते शरीरातील एखाद्या मोठ्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

हिमोग्लोबिनची धोकादायक पातळी कशी ओळखावी?

हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिनांचे रूप असून ते फुफ्फुसांतून ऑक्सिजन घेऊन शरीराच्या सर्व पेशी आणि अवयवांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते.

हिमोग्लोबिनची सामान्य पातळी:

  • पुरुष: १३.८ ते १७.२ g/dl

  • महिला: १२.१ ते १५.१ g/dl

  • मुले: ११ ते १६ g/dl

पुरुषांमध्ये १७.२ g/dl पेक्षा जास्त, तर महिला आणि मुलांमध्ये १६ g/dl किंवा त्याहून अधिक हिमोग्लोबिनची पातळी धोकादायक मानली जाते.

हिमोग्लोबिन वाढण्याची कारणे काय?

  • 'पॉलिसायथेमिया व्हेरा' हा दुर्मिळ रक्त कर्करोग हिमोग्लोबिन वाढण्याचे प्राथमिक कारण ठरू शकतो.

  • फुफ्फुसांचे आजार, तीव्र दमा किंवा स्लीप एपनिया.

  • धूम्रपानाची सवय आणि कार्बन मोनॉक्साइड किंवा प्रदूषित हवेचा थेट संपर्क.

  • उंचावरील भागात ऑक्सिजनची कमतरता असल्याने शरीरात आपोआप हिमोग्लोबिनचे उत्पादन वाढणे.

  • शरीरात पाण्याचे प्रमाण गंभीररीत्या कमी होणे.

  • मूत्रपिंडाचे (किडनी) आजार, गाठी किंवा जन्मजात हृदयाच्या समस्या.

लक्षणे कोणती?

डोकेदुखी, चक्कर येणे, अंधारी येणे, अंधुक दिसणे, तीव्र थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, हात-पायांची त्वचा लाल पडणे आणि महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान अतिरक्तस्राव होणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत.

संभाव्य धोके कोणते?

हिमोग्लोबिन प्रमाणाबाहेर वाढल्यास अत्यंत गंभीर वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यामुळे रक्तात गाठी होणे, पक्षाघात, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, यकृताचा आकार वाढणे आणि महत्त्वाच्या अवयवांपर्यंत रक्ताभिसरण मंदावणे यांसारखे धोके संभवतात.

प्रतिबंधात्मक उपाय कोणते?

  • धूम्रपान पूर्णपणे टाळा आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा.

  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आयर्न सप्लीमेंट्स घेऊ नका.

  • लठ्ठपणा, मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवा.

  • एकाच जागी तासनतास बसून राहणे टाळा.

  • श्वासोच्छवासाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी उंचावर प्रवास करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

  • सतत चक्कर येणे, कारणाशिवाय थकवा जाणवणे, श्वास घेताना त्रास होणे किंवा चाचणी अहवालात हिमोग्लोबिनची पातळी सातत्याने जास्त येत असल्यास तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(टीप: वरील माहिती ही केवळ सामान्य जागरूकतेसाठी आहे. आरोग्यविषयक कोणत्याही समस्येसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT