Summer Health Risk Pudhari
आरोग्य

Summer Health: उष्माघाताचा वाढता धोका! उन्हाळ्यात जास्त काळजी कुणी घ्यावी? आहार कसा असावा? जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून

Summer Health Risk: उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे हृदय आणि किडनीच्या रुग्णांसाठी धोका वाढतो. रक्तदाब कमी झाल्याने हृदयावर ताण येतो आणि उष्माघाताचे प्रमाण वाढते.

पुढारी वृत्तसेवा

Summer Health Risk: उन्हाळ्याची तीव्रता दरवर्षी वाढत असून याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असल्याचा इशारा डॉ. प्रदीप आवटे यांनी दिला आहे. विशेषतः हृदयविकार आणि किडनीच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हा काळ अधिक धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. आवटे यांच्या मते, गेल्या काही वर्षांत उष्णतेची तीव्रता वाढली आहे आणि यामुळे काही रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे, पक्क्या घरात राहणारे किंवा पंखा, कुलर यांसारख्या सुविधा असलेले लोक तुलनेने सुरक्षित राहतात. मात्र, ज्यांच्याकडे पक्के घर नाही किंवा कुलर, फॅनसारखी साधनं नाहीत, अशा लोकांवर उष्णतेचा सर्वाधिक परिणाम होतो.

थिंक बँक या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उन्हाळ्यात शरीरावर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलताना सांगितलं की, या काळात रक्तदाब कमी होतो. परिणामी, शरीरात रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते.

यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि आधीच हृदयविकार असलेल्या रुग्णांना अधिक त्रास होतो. त्यामुळे उन्हाळ्यात नैसर्गिक मृत्यूंचे प्रमाण वाढताना दिसते. तसेच, उष्णतेमुळे त्वचेच्या समस्याही वाढतात. घामामुळे त्वचेतील ग्रंथी ब्लॉक होऊन पुरळ, हिट रॅश यांसारख्या समस्या उद्भवतात.

उन्हाळ्यात आहार कसा असावा?

आहाराबाबतही डॉ. आवटे यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. उन्हाळ्यात एकावेळी जास्त खाण्याऐवजी थोडं-थोडं खाणं फायदेशीर ठरतं. पोट भरून खाणं टाळावं. तसेच हाय-प्रोटीन आहार, खूप मसालेदार किंवा गोड पदार्थ आणि शिळं अन्न टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

उन्हाळा म्हणजे जत्रा, यात्रा आणि लग्नसराईचा हंगाम. मात्र, या काळात दुपारच्या कडक उन्हात होणारे कार्यक्रम धोकादायक ठरू शकतात. अनेकदा लोक कार्यक्रमात भरपूर खातात आणि नंतर नाच-गाणं करतात, ज्यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. अशा घटनांमध्ये काही वेळा मृत्यूही होऊ शकतो.

त्यामुळे भविष्यात लग्नसमारंभ किंवा सार्वजनिक कार्यक्रम सकाळी लवकर किंवा संध्याकाळी आयोजित करण्याचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जत्रा आणि मिरवणुका देखील उन्हाची तीव्रता कमी असताना घेणे अधिक सुरक्षित ठरेल.

एकूणच, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे, योग्य आहार आणि वेळेचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः ज्यांना आधीपासून आजार आहेत किंवा जे अत्यंत उष्ण परिस्थितीत राहतात, त्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT