आपल्याला सकाळी उठायचं असतं, पण गजर वाजल्यावर पुन्हा काही मिनिटांची झोप घ्यायची सवय अनेकांना असते. बहुतेक वेळेस ‘स्नूझ’ बटण दाबलं जातं तेवढीच काही शांत मिनिटं मिळतील, असं वाटतं. मात्र, Mass General Brigham संस्थेच्या संशोधनातून असे समोर आले आहे की ‘स्नूझ’ बटण दाबणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. विशेषतः सकाळच्या REM (Rapid Eye Movement) झोपेच्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये व्यत्यय निर्माण होतो, ज्यामुळे मेंदूचा आराम पूर्ण होत नाही.
या अभ्यासात 21,000 लोकांचे 30 लाखांहून अधिक झोपेचे डेटा अॅनालायझ करण्यात आले. त्यातून स्पष्ट झाले की 56% लोक झोपेच्या शेवटी स्नूझ बटण वापरतात आणि सरासरी 11 मिनिटं ‘स्नूझ’मध्ये घालवतात. विशेष म्हणजे 45% लोक आठवड्याच्या 80% दिवसांत गजराला 'स्नूझ' करतात.
अभ्यासकांनी हेही निदर्शनास आणले की स्नूझ करणाऱ्यांची झोपेची वेळ ठरलेली नसते आणि त्यांची झोप पूर्ण झालेली नसते. झोप पूर्ण न झाल्यामुळे लोक ‘स्नूझ’ बटण का वापरतात आणि त्याचा मेंदू व शरीरावर काय परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी 21,000 वापरकर्त्यांचा 30 लाख झोपांचा डेटा अभ्यासला गेला.
स्नूझ वापराची सरासरी वेळ: लोक सरासरी 11 मिनिटं ‘स्नूझ’ करत झोपण्याचा प्रयत्न करतात.
झोपेतील व्यत्यय: ही वेळ झोपेच्या महत्त्वाच्या REM टप्प्यांमध्ये व्यत्यय आणते, जे मेंदूच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असते.
हलकी झोप: ‘स्नूझ’ दरम्यान मिळणारी झोप पूर्ण विश्रांती देणारी नसते, ती फक्त हलकी व अपुरी झोप असते.
56% झोपांमध्ये ‘स्नूझ’चा वापर: अभ्यासात सहभागी 21,000 लोकांपैकी निम्म्याहून अधिक लोकांनी ‘स्नूझ’ बटण वापरले.
45% लोक 80% वेळा स्नूझ करतात: हे ‘हेवी स्नूझर्स’ दररोज सरासरी 20 मिनिटं स्नूझमध्ये घालवतात.
कामकाजाच्या दिवशी जास्त स्नूझ: सोमवार ते शुक्रवारदरम्यान ‘स्नूझ’चा वापर अधिक, शनिवार-रविवारी कमी.
सर्वाधिक स्नूझ वापर: अमेरिका, स्वीडन आणि जर्मनी.
कमी वापर: जपान आणि ऑस्ट्रेलिया – तिथे लोक ‘स्नूझ’ बटण फारच कमी वापरतात.
REM झोपेचा व्यत्यय: गजरानंतरचा वेळ हा REM झोपेने भरलेला असतो. स्नूझमुळे ही झोप मोडते.
आरोग्यावर परिणाम: झोप पूर्ण न झाल्याने थकवा, एकाग्रता कमी, मानसिक अस्वस्थता वाढू शकते.
सल्ला: पहिल्याच गजरावर उठणे व गजर वेळेवरच लावणे हेच सर्वात उत्तम.