Grey Hair file photo
आरोग्य

Grey Hair: चिनी लोक पांढरे केस का उपटत नाहीत?

डोक्यावर एखादा पांढरा केस दिसताच अनेक लोक तो लगेच उपटून टाकतात. मात्र, चीनमधील लोक असे करणे टाळतात. याचे कारण काय? केस काळे ठेवण्यासाठी चीनमध्ये काय करतात? जाणून घ्या.

पुढारी वृत्तसेवा

Grey Hair

बीजिंग: डोक्यावर एखादा पांढरा केस दिसला की, तो लगेच उपटून टाकण्याची घाई अनेकांना असते. मात्र, चीनमध्ये असे करण्याचे नागरिक आवर्जून टाळतात. चीनमध्ये वर्षानुवर्षे चालत आलेली एक रंजक अंधश्रद्धा यामागे आहे. 'जर तुम्ही एक पांढरा केस उपटला, तर त्या जागी आणखी तीन नवे पांढरे केस उगवतात', अशी तिथल्या लोकांची समजूत आहे. काही लोक तर एक केस उपटल्यास तब्बल १० पांढरे केस येतात, असे मानतात.

जुन्या जाणत्यांच्या या गोष्टी ऐकायला जरी रंजक वाटत असल्या, तरी चीनमध्ये आजही या समजुतीला मानणारा मोठा वर्ग आहे. म्हणूनच पांढरा केस दिसला तरी चिनी नागरिक त्याला स्पर्शही करत नाहीत. याशिवाय केस काळे राखण्यासाठी तिथले लोक चक्क डुकराची आतडी खाण्यासारखे अजब उपायही करतात.

विज्ञान काय सांगते? तज्ज्ञांचा खुलासा

तज्ज्ञांच्या मते, असे अजिबात घडत नाही. केसांचा रंग 'मेलॅनिन' नावाच्या रंगद्रव्यामुळे ठरतो, जे केसांच्या मुळाशी किंवा 'हेअर फॉलिकल्स'मध्ये तयार होते. जर एखादा पांढरा केस उपटला, तर सहसा त्याच जागेवरून फक्त एकच नवीन केस पुन्हा उगवतो. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की वारंवार केस उपटल्याने केसांच्या मुळांना इजा होऊ शकते. यामुळे भविष्यात त्या भागात केस येणे बंद होऊ शकते. थोडक्यात सांगायचे तर, एक पांढरा केस उपटल्याने तीन नवीन केस उगवत नाहीत, परंतु वारंवार केस उपटल्याने हानिकारक ठरू शकते.

केस काळे ठेवण्यासाठी चीनमध्ये काय करतात?

'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या एका अहवालानुसार, चिनी लोकांच्या केवळ पांढऱ्या केसांबाबतच समजुती नाहीत, तर केस काळे ठेवण्यासाठी ते विविध पारंपरिक पद्धती वापरतात. काळे तीळ, काळे सोयाबीन आणि काळे समुद्री शेवाळ यांसारख्या पदार्थांचे सेवन केल्याने केस दीर्घकाळ काळे राहण्यास मदत होते, असे मानले जाते. काहींचा असाही विश्वास आहे की या पदार्थांमुळे पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ शकतात.

पारंपरिक चिनी समजुतींमध्ये आणखी एक विशिष्ट गोष्ट पाहायला मिळते. या तत्त्वानुसार, ज्या शरीराच्या अवयवाला बळकट करायचे आहे, त्या अवयवाशी साधर्म्य असणाऱ्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. म्हणूनच अनेक लोक प्राण्यांचे अवयव खातात; त्यांचा असा विश्वास असतो की असे केल्याने संबंधित मानवी अवयवाची ताकद वाढते. याचे एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे 'लुझू'; हा बीजिंगमधील एक 'स्ट्रीट फूड' प्रकार आहे जो डुकराची आतडी, फुफ्फुसे आणि तळलेले टोफू (सोयाबीनचे पनीर) वापरून बनवला जातो.

काळे तीळ: केसांचा मित्र

पारंपरिक चिनी वैद्यकशास्त्रात, काळे तीळ केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. तेथील समजुतींनुसार, केसांचे आरोग्य हे रक्त आणि मूत्रपिंडांच्या ऊर्जेशी जोडलेले मानले जाते. काळे तीळ खाल्ल्याने रक्ताचे प्रमाण वाढते असे मानले जाते; त्यामुळेच, केस काळे राखण्यासाठी शतकानुशतके याचा वापर केला जात आहे.

५० वर्षांच्या शेतकऱ्याची 'ती' जादूई वनस्पती

केस काळे ठेवण्यासाठी चीनमध्ये वापरला जाणारा आणखी एक लोकप्रिय उपाय म्हणजे 'हे ​​शो वू' ही वनस्पती. विशेष म्हणजे, या औषधी वनस्पतीचे नाव शब्दशः "श्री. 'हे' यांचे काळे केस" असे आहे. एका दंतकथेनुसार, 'हे' नावाच्या एका शेतकऱ्याने वयाच्या ५० व्या वर्षी ही वनस्पती खाल्ली होती, त्यानंतर त्याचे पांढरे झालेले केस पुन्हा काळे झाले. तेव्हापासून, केसांसाठीचा एक चमत्कारिक उपाय म्हणून ही वनस्पती ओळखली जाते. आजही, केस गळती रोखण्यासाठी आणि केस काळे राखण्यासाठी चिनमध्ये ऑनलाइन विकली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT