fssai caught adulterated tomato sauce simple tips to spot real vs fake sauce
पुढारी ऑनलाईन : बर्गर, समोसा, मोमोज यांसोबत बहुतेक लोक टोमॅटो सॉस आवडीने खातात. अनेक मुले तर सॉसशिवाय सँडविचदेखील खात नाहीत. पण तुम्ही खात असलेला सॉस खरोखर टोमॅटोपासून बनलेला आहे का? अन्न सुरक्षा विभागाने (FSSAI) मोठ्या प्रमाणात बनावट टोमॅटो सॉस जप्त केला असून त्यामध्ये टोमॅटोचा अंशही आढळला नाही.
FSSAI म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण. हे संस्थान अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासते आणि भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई करते. उत्तर प्रदेशातील हापूर येथे अन्न सुरक्षा विभागाने बनावट आणि भेसळयुक्त टोमॅटो सॉस तयार करणाऱ्या एका कंपनीवर छापा टाकून सुमारे २३५ किलो सॉस जप्त केला. तपासात या सॉसमध्ये टोमॅटोऐवजी गाजराचा लगदा, कृत्रिम लाल रंग आणि इतर रसायनांचा वापर केल्याचे आढळले.
हा सॉस स्थानिक हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकानांमध्ये विकला जात होता. त्यामुळे नकळत अनेक लोक आणि लहान मुलेही हा भेसळयुक्त सॉस खात असण्याची शक्यता आहे.
बनावट टोमॅटो सॉस कसा तयार केला जातो?
बनावट सॉसमध्ये लाल रासायनिक रंग, गाजराचा लगदा आणि व्हिनेगर (सिरका) मिसळून त्याला टोमॅटो सॉससारखा रंग, चव आणि घट्टपणा दिला जातो. त्यामुळे ग्राहकांना तो खरा टोमॅटो सॉस असल्याचा भास होतो.
बनावट सॉस ओळखण्याचे सोपे उपाय
पाण्याची चाचणी
एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यात थोडा सॉस टाका. जर सॉस लगेच विरघळून पाण्याचा रंग बदलला, तर तो बनावट असू शकतो. खरा टोमॅटो सॉस सहज विरघळत नाही आणि काही प्रमाणात पाण्याच्या पृष्ठभागावर राहतो.
रंग तपासा
खऱ्या टोमॅटो सॉसचा रंग नैसर्गिक लाल असतो. बनावट सॉसमध्ये लालसर-तपकिरी किंवा काळपट छटा दिसू शकते. तसेच त्यामध्ये गाठी किंवा काळे डागही दिसू शकतात.
टेक्स्चर (घट्टपणा) पाहा
खरा टोमॅटो सॉस घट्ट आणि एकसारखा असतो. तो हाताला जास्त चिकटत नाही. बनावट सॉस मात्र जास्त चिकट किंवा पातळ वाटू शकतो. काही उत्पादक तो घट्ट दिसावा म्हणून त्यात कॉर्नस्टार्च मिसळतात.
मिठाची चाचणी
एका वाटीत सॉस घेऊन त्यात थोडे मीठ टाका. जर सॉसचा रंग बदलून निळसर झाला, तर त्यात भेसळ किंवा कृत्रिम रंग असण्याची शक्यता असते. खऱ्या टोमॅटो सॉसचा रंग मीठ घातल्यावर बदलत नाही.
सॉस खरेदी करताना काय काळजी घ्यावी?
नेहमी विश्वासार्ह आणि नामांकित ब्रँडचा सॉस खरेदी करा.
पॅकेटवरील FSSAI परवाना क्रमांक तपासा.
घटकांची (Ingredients) यादी वाचा.
अत्यंत स्वस्त दरात मिळणाऱ्या सॉसपासून सावध रहा.
रंग, वास किंवा चव संशयास्पद वाटल्यास तो वापरणे टाळा.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच टोमॅटो सॉस आवडतो. मात्र भेसळयुक्त सॉस आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे खरेदीपूर्वी आणि वापरताना योग्य तपासणी करणे गरजेचे आहे.