

मनोज गव्हाणे
नेकनूर : अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे बीड जिल्ह्यातील सुपुत्र तुकाराम मुंढे यांच्याकडे येताच, त्यांच्या होमपिच असलेल्या बीड जिल्ह्यात खवा उत्पादन घटल्याचे मोठे चित्र पाहायला मिळत आहे. शहरांकडे जाणारे खव्याचे शेकडो डाग आता थेट अर्ध्यावर आले असून, याचबरोबर किराणा दुकानाच्या दारात ठेवलेल्या खाद्यतेलाच्या टाक्या बाजारपेठेतून गायब झाल्याचे पाहायला मिळू लागले आहे. या धडक मोहिमेमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे पूर्णतः दणाणले असून, लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या माफियांना आता लपण्यासाठी वेगळा मार्ग निवडावा लागत आहे.
बीड जिल्ह्यातील नेकनूर आणि केज परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात खवा पुणे, छत्रपती संभाजीनगर आदी शहरांकडे पाठवला जातो. या व्यवसायातील साखळी आणि आर्थिक उलाढाल खूप मोठी असल्याने, अलीकडच्या काळात यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ सुरू झाली होती. खवा बनवण्यासाठी केमिकलचा सर्रास वापर केला जात होता. मात्र, आतापर्यंत या विभागाचे याकडे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष असल्याने, हा भेसळयुक्त खवा मिठाईच्या माध्यमातून बिनधास्तपणे नागरिकांच्या ताटात जात होता आणि लोकांच्या आरोग्याशी खेळ मांडला जात होता.
खव्यासोबतच रोजच्या जेवणात वापरले जाणारे खाद्यतेलही त्याच भेसळयुक्त पद्धतीचे होते की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण अन्न आणि औषध प्रशासन विभागाची सूत्रे तुकाराम मुंढे यांच्याकडे येताच जिल्ह्यातील बाजारपेठेतून तेल आणि खवा दोन्ही लपल्याचे चित्र आहे. शेकडो खव्याचे डाग अर्ध्यावर आल्याने यातील भेसळीचे प्रमाण स्पष्ट होत आहे, तर दुकानाच्या दारातील तेलाच्या टाक्या गायब झाल्याने हा भेसळीचा गोरखधंदा आतापर्यंत लोकांच्या जिवाशी कसा खेळत होता, हे समोर आले आहे.
आतापर्यंत केवळ शांत राहिलेला अन्न विभाग आयुक्त मुंढेंच्या कडक इशाऱ्यानंतर जागा झाला आहे. लायसन्स तपासणीसोबतच कारवाईचा बडगा आता कुठे 'अर्था'च्या (आर्थिक देवाणघेवाणीच्या) बाहेर पडला असल्याचे दिसून येत आहे. लायसन्स आणि सॅम्पल तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग झोपेतून उठून कामाला लागल्याने, भेसळयुक्त व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.