Nithin Kamath Fitness Bet: वजन कमी करणं हे अनेकांसाठी स्पप्न असतं, पण ते पूर्ण करणारे फार कमी असतात. मात्र एका कर्मचाऱ्याने केवळ आपले वजनच कमी केले नाही, तर त्याबदल्यात तब्बल 2.5 लाख रुपयांचे बक्षीसही जिंकले आहे. विशेष म्हणजे हे बक्षीस त्याला स्वतःच्या कंपनीच्या सीईओकडून मिळाले आहे. ही प्रेरणादायी कहाणी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
ही घटना देशातील आघाडीच्या स्टॉक ब्रोकिंग कंपनी झेरोधाशी संबंधित आहे. कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ नितीन कामत यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. त्यांनी सांगितले की, कंपनीतील कंटेंट आणि मीडिया स्ट्रॅटेजिस्ट रोहित अगरवाला यांच्यासोबत एका फिटनेस चॅलेंजवर पैज लावण्यात आली होती.
काही महिन्यांपूर्वी रोहित यांचे वजन सुमारे 104 किलो होते. आरोग्य सुधारण्यासाठी त्यांनी वजन कमी करण्याचा निर्धार केला. दरम्यान, कार्यालयात एक फिटनेस चॅलेंज सुरू झाले आणि त्यात एक अट ठेवण्यात आली. रोहित यांनी ठराविक कालावधीत आपले वजन मोठ्या प्रमाणात कमी केले, तर त्यांना 2.5 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
रोहित यांनी हे आव्हान अत्यंत गांभीर्याने स्वीकारले. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैलीच्या जोरावर त्यांनी वजन कमी करण्याचा निर्धार केला. चॅलेंज सुरू होईपर्यंत त्यांनी 104 किलोवरून 95 किलोपर्यंत वजन कमी केले होते. त्यानंतर त्यांचे पुढील लक्ष्य 75 किलोपर्यंत पोहोचण्याचे होते.
अखेर कठोर मेहनतीचे फळ मिळाले. जानेवारीच्या सुरुवातीला रोहित यांचे वजन 74.5 किलोपर्यंत खाली आले. म्हणजेच त्यांनी तब्बल 30 किलो वजन कमी करून लक्ष्यही गाठले. यामुळे नितीन कामत यांना पैज हरावी लागली आणि त्यांनी आनंदाने 2.5 लाख रुपयांचे बक्षीस दिले.
नितीन कामत यांनी सोशल मीडियावर रोहितसोबतचा फोटो शेअर करत, "ही पैज हरलो याचा मला आनंद आहे," असे म्हटले. त्यांनी रोहित यांच्या जिद्दीचे, सातत्याचे आणि शिस्तीचे कौतुक करत इतरांसाठीही हा आदर्श असल्याचे सांगितले.
रोहित यांनीदेखील आपला फिटनेस प्रवास सोशल मीडियावर शेअर केला. त्यांच्या मते, 2.5 लाख रुपयांचे बक्षीस महत्त्वाचे असले तरी त्याहून मोठा फायदा म्हणजे चांगली तब्येत. एका वर्षात 30 किलो वजन कमी करणे हे त्यांच्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठ्या यशांपैकी एक आहे.