High Cholesterol File Photo
आरोग्य

High Cholesterol: जिमला जाणाऱ्या आणि तंदुरुस्त व्यक्तींचेही वाढू शकते बॅड कोलेस्ट्रॉल; तुमच्या डॉक्टरांना विचारा हे ३ प्रश्न

नियमित व्यायाम करणारे आणि दिसायला फिट असणारे लोकही कोलेस्ट्रॉलच्या समस्येला बळी पडू शकतात. बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची सुरुवातीची लक्षणे अनेकदा दिसून येत नाहीत. यासाठी डॉक्टरांना तीन प्रश्न विचारणे आवश्यक आहे.

मोहन कारंडे

High Cholesterol

नवी दिल्ली: सध्या हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकारा संबंधीत घटना वेगाने वाढत आहेत. याचे एक मुख्य कारण म्हणजे शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी. सर्वात धोकादायक बाब म्हणजे, बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

परिणामी, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ते शरीरात हळूहळू साचत जाते आणि कालांतराने हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकारास कारणीभूत ठरते. म्हणूनच, नियमित 'लिपिड प्रोफाईल' तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि यासंदर्भात तुम्ही तुमच्या डॉक्टरांना तीन महत्त्वाचे प्रश्न विचारले पाहिजेत.

बॅड कोलेस्ट्रॉलचा परिणाम केवळ वृद्ध व्यक्तींवरच होतो का?

असा सर्वसाधारण समज आहे की वाढते वय किंवा शारीरिक हालचालींचा अभाव ही हृदयविकाराची मुख्य कारणे आहेत; परंतु वास्तव असे आहे की, बॅड कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी केवळ वृद्ध किंवा अयोग्य जीवनशैली जगणाऱ्या लोकांपुरती मर्यादित नाही.

तुम्ही तरुण असाल, नियमित व्यायाम करत असाल आणि संतुलित आहार घेत असाल, तरीही आनुवंशिक कारणे किंवा कौटुंबिक इतिहासामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढलेली असू शकते. त्यामुळे दिसायला फिट असणे म्हणजे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात आहे, याची हमी नाही. याच कारणामुळे वयाच्या १८व्या वर्षापासून नियमित लिपिड प्रोफाइल तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. कोलेस्ट्रॉलची समस्या वेळीच लक्षात आल्यास योग्य उपचार सुरू करता येतात आणि भविष्यातील हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक उपाय करता येतात.

डॉक्टरांना काय विचारावे?

माझ्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी किती आहे?

आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये 'प्लाक' (चरबीचा थर) साचण्यास बॅड कोलेस्ट्रॉल कारणीभूत असते. याची कोणतीही लक्षणे दिसत नसल्यामुळे, लिपिड चाचणीद्वारे बॅड कोलेस्ट्रॉलची नेमकी पातळी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

माझ्या आरोग्यानुसार एलडीएलची लक्ष्य पातळी किती असावी?

कोलेस्ट्रॉलची सुरक्षित पातळी प्रत्येकासाठी सारखी नसते. 'कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया'नुसार, तुमची लक्ष्य पातळी तुमच्या हृदयाच्या एकूण आरोग्यावर अवलंबून असते.

कमी जोखीम : ११६ mg/dL पेक्षा कमी

मध्यम जोखीम : १०० mg/dL पेक्षा कमी

उच्च जोखीम : मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा किडनीचा आजार असणाऱ्यांसाठी ७० mg/dL पेक्षा कमी

अतिउच्च जोखीम : ५५ mg/dL पेक्षा कमी

मात्र, तुमच्यासाठी योग्य लक्ष्य पातळी कोणती असावी, हे वैयक्तिक आरोग्यस्थिती पाहून डॉक्टरच निश्चित करू शकतात.

मी माझ्या लक्ष्य पातळीपर्यंत पोहोचलो आहे का? नसेल तर पुढचे पर्याय कोणते?

केवळ औषधे घेणे किंवा सकस आहार घेणे हे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी पुरेसे नाही. जीवनशैलीतील बदल आणि औषधोपचार करूनही कोलेस्ट्रॉल कमी होत नसेल, तर डॉक्टर उपचारांच्या पद्धतीत बदल करू शकतात. उच्च जोखमीच्या श्रेणीतील व्यक्तींसाठी, डॉक्टर प्रगत उपचार पद्धतींचाही विचार करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT