प्रतीकात्मक छायाचित्र. 
आरोग्य

electrolyte powder myth| व्यायामानंतर 'इलेक्ट्रोलाइट' पिताय? तुमचे कष्टाचे पैसे पाण्यात जातायत! जाणून घ्या संशोधकांचा खुलासा

electrolyte powder myth | शरीर नैसर्गिकरित्या इलेक्ट्रोलाइट्सची पातळी स्‍थिर ठेवण्‍यास सक्षम, घरच्या घरी बनवता येते नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट ड्रिंक

पुढारी वृत्तसेवा

शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची (सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम) पातळी कमी होणे ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. आपले शरीर नैसर्गिकरित्या ही पातळी स्थिर ठेवण्यास सक्षम असते.

electrolyte powder myth

मुंबई : जिम असो की रस्त्यावर धावणे, व्यायाम करताना हातामध्ये इलेक्ट्रोलाइट पेयाची बाटली असणे ही तरुणाईसाठी एक फॅशनच झाली आहे. कारणही तसेच आहे, 'इलेक्ट्रोलाइट पावडर तुम्हाला व्यायामातील थकवा कमी करण्यास मदत करते', असा दावा उत्‍पादक कंपन्यांकडून केला जातो. व्यायामासाठी हे सक्तीचे असल्याचेही मनावर बिंबवले जाते. मात्र, नियमित सामान्य व्यायाम करणारे असो की कार्यालय व प्रवासात इलेक्ट्रोलाइट्स पिणार्‍यांना 'जॉन मूर्स युनिव्हर्सिटी'च्या क्रीडा पोषण संशोधकांनी मोलाचा सल्ला दिला आहे. जाणून घेऊया याविषयी...

शरीर स्वतःच संतुलन राखण्यास समर्थ

क्रीडा पोषण संशोधक प्रोफेसर ग्रॅमी क्लोज सांगतात की, शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची (सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम) पातळी कमी होणे ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. आपले शरीर नैसर्गिकरित्या ही पातळी स्थिर ठेवण्यास सक्षम असते. बहुतेक लोकांना त्यांच्या नियमित संतुलित आहारातूनच पुरेसे इलेक्ट्रोलाइट्स मिळतात. दैनंदिन अन्नातील मीठ, फळे आणि भाज्या पोटॅशियम व मॅग्नेशियमची गरज सहज पूर्ण करतात.

इलेक्ट्रोलाइट्सची शरीराला गरज केव्हा भासते?

इलेक्ट्रोलाइट्सची गरज सर्वांनाच असते असे नाही. 'बीबीसी'च्या कार्यक्रमात बोलताना क्लोज यांनी स्पष्ट केले की, जेव्हा तुम्ही दीर्घकाळ आणि कठोर व्यायाम करता आणि खूप घाम येतो, तेव्हाच इलेक्ट्रोलाइट्सची गरज भासते. व्यायामादरम्यान शरीरातून बाहेर पडणारा घाम 'खारट' असेल, तर सोडियमची कमतरता भरून काढणे फायदेशीर ठरते. तसेच, ज्यांना साधे पाणी पिणे आवडत नाही, त्यांना या पेयांच्या चवीमुळे जास्त पाणी पिण्यास प्रोत्साहन मिळू शकते.

Drinking Water

फक्त पाणी पुरेसे...

तुम्ही जिममध्ये जात असाल किंवा दररोज ५ किलोमीटर धावण्यासारखा मध्यम स्वरूपाचा व्यायाम करत असाल, तर फक्त पाणी पुरेसे आहे. इलेक्ट्रोलाइट्स पावडरवर कष्टाचे पैसे खर्च करू नका, असा सल्लाही प्रो. ग्रॅमी क्लोज देतात.

महागड्या पावडरला 'घरगुती' पर्याय

बाजारात मिळणारे महागडे सॅशे किंवा पावडर खरेदी करण्यापेक्षा क्लोज यांनी एक सोपा घरगुती पर्याय सुचवला आहे. तो पुढीलप्रमाणे:

  • दोन तृतीयांश पाणी, एक तृतीयांश फळांचा रस (उदा. अननस) आणि चिमूटभर मीठ एकत्र करा.

  • हे मिश्रण ६% कार्बोहायड्रेट आणि इलेक्ट्रोलाइट्सचे उत्तम द्रावण तयार करते, जे बाजारातील उत्पादनांच्या तोडीचे असते.

सकाळच्या इलेक्ट्रोलाइट पेयेपेक्षा 'ऑम्लेट' उत्तम

अनेकजण सकाळी उठल्याबरोबर इलेक्ट्रोलाइट पेये घेतात, मात्र याचे कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. प्रो. क्लोज म्हणतात की, एका सॅशेमधून मिळणाऱ्या खनिजांपेक्षा ऑम्लेटसारख्या पदार्थातून कितीतरी जास्त इलेक्ट्रोलाइट्स मिळतात. त्यामुळे सकाळी काहीतरी पौष्टिक खाणे अधिक प्रभावी ठरते.

स्पोर्ट्स ड्रिंक्सचा वैज्ञानिक आधार केवळ कार्बोहायड्रेट्सपुरता मर्यादित

स्पोर्ट्स ड्रिंक्सचा वैज्ञानिक आधार केवळ कार्बोहायड्रेट्सपुरता मर्यादित आहे. ७० ते ९० मिनिटांच्या कठोर व्यायामानंतर शरीरातील ऊर्जा संपते, तेव्हाच अशा पेयांचा फायदा होतो. इतर खनिजे (कॅल्शियम, फॉस्फरस) भरून काढल्याने कामगिरी सुधारते, याचे पुरावे नाहीत. ही उत्पादने तुम्हाला अधिक वेगवान किंवा मजबूत बनवत नाहीत. "जर एखादे उत्पादन तुमच्या कार्यक्षमतेत १० टक्के वाढ होणार असल्याचा दावा करत असेल, तर तो धादांत खोटा आहे," असा इशाराही प्रोफेसर ग्रॅमी क्लोज यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT