कर्करोग म्हणजे शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ होणे. या पेशी आजूबाजूच्या ऊतींमध्ये पसरू शकतात आणि रक्तवाहिन्या किंवा लिम्फ वाहिन्यांद्वारे शरीरातील इतर भागांपर्यंतही पोहोचू शकतात. यालाच मेटास्टेसिस असे म्हणतात. कर्करोग अनेक प्रकारांचा असतो आणि तो वेळेत ओळखल्यास उपचार शक्य होतो.
शरीरात सतत थकवा जाणवणे, गाठी किंवा सूज निर्माण होणे, त्वचेवर काळे डाग किंवा पिवळसरपणा दिसणे, दीर्घकाळचा खोकला, श्वास घेण्यास त्रास, अन्न गिळताना अडचण, अपचन, शौच आणि लघवीच्या सवयींमध्ये अचानक बदल – ही लक्षणं कर्करोगाची सुरुवात दर्शवू शकतात.
जास्त चरबीमुळे शरीरात दाह, हार्मोनमध्ये असंतुलन आणि इन्सुलिन प्रतिकार निर्माण होतो, ज्यामुळे स्तन, पचनमार्ग आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. संतुलित आहार आणि नियमित व्यायामाद्वारे वजन नियंत्रणात ठेवणे फायदेशीर ठरते.
आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम केल्याने शरीरातील इन्सुलिन, एस्ट्रोजेन यांसारख्या हार्मोनचे प्रमाण संतुलित राहते. व्यायामामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारते आणि शरीरातील सूज कमी होते.
सिगारेट आणि तंबाखूमुळे DNA मध्ये बदल होतो आणि शरीराच्या अनेक अवयवांवर परिणाम होतो. हे कर्करोग होण्याचं प्रमुख कारण आहे. तंबाखू सोडल्यास केवळ फुफ्फुस नाही, तर इतर प्रकारच्या कर्करोगांचाही धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
फळं, हिरव्या भाज्या, कडधान्यं आणि संपूर्ण धान्ये यामुळे अँटिऑक्सिडंट्स, फायबर्स मिळतात जे पेशींना नुकसानापासून वाचवतात. प्रोसेस्ड आणि फॅटी मांसाचे सेवन कमी केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
अल्कोहोलचे शरीरात अॅसिटाल्डिहाइडमध्ये रूपांतर होते, जे DNA आणि प्रथिनांचं नुकसान करतं. विशेषतः महिलांमध्ये अल्कोहोलमुळे स्तन कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे अल्कोहोलचं प्रमाण कमी ठेवा.
UV किरणांमुळे त्वचेच्या पेशींमध्ये DNA डॅमेज होऊन त्वचा कर्करोग होऊ शकतो. सनस्क्रीन वापरणे, टोपी आणि UV संरक्षक कपडे परिधान करणे हे त्वचेला सुरक्षित ठेवण्याचे सोपे मार्ग आहेत.
काही कर्करोग लवकर ओळखल्यास त्यावर यशस्वी उपचार शक्य होतात. मॅमोग्रॅम, कोलोनोस्कोपी अशा चाचण्या वेळेवर करून घेतल्यास कर्करोग आधीच रोखता येतो.
HPV लस ही गर्भाशय, गुदमार्ग आणि तोंडाच्या कर्करोगाविरुद्ध संरक्षण देते. हिपॅटायटिस B लसीमुळे यकृत कर्करोगाचा धोका टाळता येतो. वेळेवर लसीकरण हे कर्करोग प्रतिबंधातील प्रभावी उपाय आहे.