मधुमेहाच्या रुग्णांनी अशी घ्या, पायाची काळजी  File Photo
आरोग्य

Diabetes Care Tips| मधुमेहाच्या रुग्णांनी अशी घ्या, पायाची काळजी

पुढारी वृत्तसेवा

शरीरातील साखरेची पातळी वाढणे किंवा हायपरग्लायसेमिया ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. उच्च साखरेची पातळी शरीरावर अनेक नकारात्मक प्रभाव पाडते. मधुमेहाची लक्षणे चटकन दिसत नसल्याने बहुतेक जण याबाबत गाफील असतात. पण, जेव्हा मधुमेह धोकादायक पातळीपर्यंत वाढतो आणि साखरेची पातळी झपाट्याने वाढते तेव्हा स्थिती गंभीरावस्थेत पोहोचलेली असू शकते.

वास्तविक, मधुमेहींनी पायांचे नियमितपणाने निरीक्षण केल्यास शरीरात होणाऱ्या बदलांचे आकलन चटकन होऊ शकते. पायात मुंग्या येणे आणि सुन्न होणे : रक्तातील साखरेची उच्च पातळी नसांना हानी पोहोचवू शकते. याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात. यामुळे पायांना मुंग्या येणे, जळजळ होणे आणि बधिरपणा येऊ शकतो.

संशोधनानुसार, मधुमेह असलेल्या रुग्णांपैकी सुमारे ५० टक्के रुग्णांना डायबेटिक न्यूरोपॅथीचा सामना करावा लागतो. यामध्ये हातपाय थरथरणे, जळजळ होणे आणि वेदना होणे यांचा समावेश असतो. यानंतर हे अवयव सुन्न होऊ लागतात. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त होते तेव्हा रक्तवाहिन्यांची भिंत कमकुवत होऊ लागते. त्यामुळेच नसा फुटण्याचीही भीती निर्माण होते.

जखमा हळूहळू बरे होणे : मधुमेहामुळे शरीराची बरी करण्याची क्षमता कमी होते. यामुळे पाय आणि घोट्यांवर झालेल्या जखमा बऱ्या होण्यास वेळ लागतो. यामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढतो.

पायांची त्वचा कोरडी पडणे: रक्तशर्करेची पातळी जास्त झाल्यास शरीरात द्रवपदार्थाची कमतरता निर्माण होऊ शकते. यामुळे पायांची त्वचा कोरडी होते आणि टाचांना भेगा पडतात. ही स्थिती वेदनादायक असू शकते आणि संसर्ग होऊ शकते.

पायाच्या नखांचा संसर्ग : मधुमेही रुग्णांना बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता सर्वांत जास्त असते. कोव्हिड काळात याविषयी बरीच चर्चा झाली होती. बुरशीजन्य संसर्गामुळे मधुमेहींची नखे पिवळी, जाड आणि ठिसूळ होऊ शकतात. वेळेवर उपचार न केल्यास हा संसर्ग गंभीर स्वरूप धारण करू शकतो.

पाय दुखणे आणि कमजोरी: उच्च साखरेची पातळी मज्जातंतूंवर परिणाम करू शकते. यामुळे पाय दुखणे, अशक्तपणा जाणवणे आणि स्नायू कमकुवत होऊन चालताना त्रास होणे, यांसारख्या समस्या जाणवू शकतात.

पायाचे व्रण : डायबेटिक अल्सर म्हणजे पायावर झालेल्या गंभीर जखमा ज्या संसर्गामुळे आणि लवकर बरे न झाल्यामुळे होतात. ही स्थिती खूप वेदनादायक असू शकते. अशा रुग्णांना रशियन सर्जरीमुळे दिलासा मिळू शकतो आणि गंभीर स्थिती उद्भवूनही पाय काढण्याची आपत्ती टळू शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT