बहुतेक लोक सकाळी अलार्म वाजल्यानंतर त्वरित उठण्याऐवजी 'स्नूज' बटन दाबून आणखी काही मिनिटं झोपण्याचा प्रयत्न करतात. ही सवय सुरुवातीला सुखद वाटू शकते, पण आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम गंभीर असू शकतात. कार्डियोलॉजिस्ट आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी याबाबत इन्स्टाग्रामद्वारे महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
डॉ. श्रीराम नेने यांच्या मते, वारंवार अलार्म स्नूज केल्याने आपल्या झोपेचा नैसर्गिक चक्र बिघडतो. यामुळे शरीर आणि मेंदूवर जणू काही वारंवार 'झटका' बसतो. परिणामी दिवसभर थकवा, चिडचिड, लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि मानसिक थकवा जाणवतो.
त्यांनी स्पष्ट केलं की, झोपेमधून उठल्यानंतर जाणवणारी सुस्ती आणि आळस म्हणजेच ‘स्लीप इनर्शिया’, ती स्नूजमुळे अधिक तीव्र होते. कारण अलार्म वाजल्यानंतर पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करताना शरीर गहन झोपेच्या दिशेने जातं, पण अल्पावधीत पुन्हा अलार्म वाजल्याने मेंदूला धक्का बसतो.
डॉ. नेने यांच्या मते, हे सततचे खंडित झोप चक्र मेंदूवर दडपण निर्माण करतं. दीर्घकाळ असे झाले तर हृदयाचं आरोग्यही बिघडू शकतं. त्यामुळे त्यांनी या सवयीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
डॉ. नेने यांनी सांगितलं की झोपेची वेळ निश्चित ठेवा. एकच अलार्म ठेवा, स्नूज टाळा. अलार्म मोबाईल बिछान्यापासून दूर ठेवा, जेणेकरून तो बंद करताना उठावं लागेल. सकाळी उठल्यानंतर हलकासा व्यायाम करा. यामुळे शरीर सशक्त राहील आणि दिवस भरारीने सुरू होईल.