

राज्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांमध्ये पुढील ३ ते ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी, विदर्भातील शेतकरी मात्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये हवामान विभागाने यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत. पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे या भागात दरड कोसळण्याचा, तसेच नद्यांचे पाणीपातळी वाढण्याचा संभाव्य धोका आहे.
दरम्यान, विदर्भात मात्र अद्याप समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा जोर फारसा नाही. परिणामी, या भागातील शेतकरी पेरण्या करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहेत. काही भागांमध्ये तर पाणीटंचाईचे संकट गडद होत चालले आहे. अकोल्यात धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचीही चिंता वाढली आहे.
हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या पश्चिम भागात अरबी समुद्रातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे ढगांची घनता वाढली आहे. यामुळे पुढील काही दिवसांत कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पावसाचे प्रमाण वाढल्यास शेतकऱ्यांना पेरण्या वेळेत करता येतील, मात्र विदर्भात लवकरात लवकर समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप हंगामाची सुरुवात उशीराने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य शासनाने हवामान परिस्थितीवर सतत लक्ष ठेवत जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.