आपण अनेकदा ऐकतो की पालक आपल्या सर्व मुलांवर सारखं प्रेम करतात, त्यांना सारखी वागणूक देतात. पण खरं आहे का? एका थेरपिस्टने यावर मन हेलावून टाकणारा खुलासा केला आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रातील थेरपिस्ट ऋरि त्रिवेदी यांनी सांगितलं की, "सर्व मुलांशी एकसारखी वागणूक देणं माणसांसाठी शक्य नाही. मशीनसाठी ते शक्य आहे, माणसासाठी नाही."
त्यांनी राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये हा मुद्दा मांडला. दरम्यान त्यांनी सांगितलं की, बहुतेकवेळा घरातील एक मूल 'अचिव्हर' म्हणून ओळखलं जातं अभ्यासात हुशार, जबाबदार, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा.
अशावेळी दुसरं मूल नकळत या 'परफेक्ट' भावंडाच्या उलट भूमिका घेतं बंडखोर, नियम तोडणारा किंवा वेगळ्या वाटेवर जाणारा. थेरपिस्टच्या मते, पालक म्हणतात की त्यांनी दोन्ही मुलांना सारखं वातावरण आणि प्रेम दिलं, पण हे शक्यच नाही.
कारण प्रत्येक मूल पालकांमध्ये वेगवेगळ्या भावना जागृत करतं, त्यांच्या प्रतिक्रिया त्या अनुभवावर आधारित असतात. म्हणूनच काही वेळा भावंडांमध्ये भेदभाव जाणवतो तो जाणूनबुजून नसला तरी असतोच.
ऋरि त्रिवेदी पुढे सांगतात की, "पालक फक्त एकसारखं जेवण देऊ शकतात, पण भावना, संवाद, आणि निर्णयांमध्ये ते भेद करतच असतात." हे सत्य कदाचित त्रासदायक वाटेल, पण हे समजून घेणं आणि स्वीकारणं हे मानसिक आरोग्यासाठी गरजेचं आहे. आपण आपल्या भावंडांबाबत जाणवणाऱ्या भावनांना जबाबदार धरण्याऐवजी त्यामागचं वास्तव स्वीकारलं पाहिजे.
प्रत्येक मुलाला स्वतंत्र ओळख द्या:
प्रत्येक मूल वेगळं असतं त्याच्या स्वभाव, क्षमतांनुसार त्याला स्वीकारा. तुलना टाळा.
तक्रारी शांतपणे ऐका:
कोणतेही मूल भेदभावाची तक्रार करत असेल, तर त्याच्या भावना नाकारू नका. ऐका आणि त्यावर समजूतदार प्रतिसाद द्या.
एकत्र वेळ घालवा, पण स्वतंत्रही द्या:
सगळ्यांना एकत्र वेळ द्या आणि प्रत्येक मुलासाठी खास स्वतंत्र वेळही ठेवा. यामुळे प्रत्येकाला "स्पेशल" वाटतं.
तोल सांभाळणारी शिस्त ठेवा:
दोन्ही मुलांवर किंवा सर्व मुलांवर एकसारखी नियमावली लावा, पण त्यांच्या वयानुसार आणि गरजेनुसार लवचिकता ठेवा.
सामान्य गोष्टी समान द्या:
जेवण, कपडे, खेळणी किंवा भेटवस्तू यामध्ये शक्यतो समानता ठेवा, जेणेकरून कोणालाही कमी वाटू नये.
तुलना टाळा:
“तो बघ किती अभ्यास करतो, तू का नाही?” अशा वाक्यांनी भावनिक नुकसान होऊ शकतं. प्रत्येकाची प्रगती त्यांच्या मापदंडांनुसार मोजा.
प्रोत्साहन आणि कौतुक समान द्या:
एखाद्या मुलाच्या यशाबद्दल कौतुक करताना, दुसऱ्याच्या लहान प्रयत्नांनाही ओळखा आणि प्रशंसा करा.
वैयक्तिक संवाद ठेवा:
प्रत्येक मुलाशी खास वैयक्तिक संवाद साधा. त्याच्या भावना, स्वप्नं समजून घ्या.
स्वतःच्या भावनिक प्रतिक्रिया तपासा:
एखाद्या मुलावर तुम्ही अधिक प्रेम, अधिक राग का व्यक्त करता हे स्वतःकडून तपासा. भावनिक प्रामाणिकता महत्त्वाची.
एकमेकांच्या भूमिका समजावून द्या:
भावंडांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी त्यांना एकमेकांच्या भूमिकेची जाणीव करून द्या "तू मोठा आहेस, पण त्याचा अर्थ असा नाही की तू नेहमीच जबाबदार!"