Digital habits & bone health 
आरोग्य

Digital habits & bone health: डिजिटल सवयींचा हाडांवर परिणाम: चाळीशीनंतरचे मणक्याचे त्रास आता थेट किशोरवयीन मुलांमध्ये

सततचा स्क्रिन टाइम ठरतोय धोकादायक! किशोरवयीन मुले बनत आहेत ऑर्थोपेडिक समस्यांचे शिकार

मोनिका क्षीरसागर

तरुण पिढीच्या डिजिटल सवयींमुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरवयीन (Teenagers) मुलांमध्ये आता मानेचे आणि मणक्याचे त्रास दिसत आहेत, जे पूर्वी फक्त ४० वर्षांवरील प्रौढांमध्ये अनुभवायला मिळत होते.

स्क्रीन टाइम ठरतोय धोकादायक

सी.के. बिर्ला हॉस्पिटलमधील (CMRI) ऑर्थोपेडिक्स विभागाचे प्रमुख डॉ. राकेश राजपूत यांनी या बदलावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, गेल्या काही वर्षांत तरुण रुग्णांमध्ये मान दुखणे, खांदे पुढे झुकणे (Rounded Shoulders), तसेच कंबर आणि सांध्यांमध्ये लवकर येणारा ताठरपणा (Stiffness) यांसारख्या समस्यांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. डॉक्टरांनी या वाढीसाठी प्रामुख्याने दीर्घकाळ स्क्रीनचा वापर आणि चुकीच्या बसण्याच्या पद्धतीला जबाबदार धरले आहे.

अनैसर्गिक, तणावपूर्ण स्थितीत राहणारा मणका

डॉ. राजपूत यांनी स्पष्ट केले की, "आजकाल मुले तासन् तास फोन किंवा लॅपटॉपवर वाकून बसतात. यामुळे मणका एका तणावपूर्ण आणि अनैसर्गिक स्थितीत दीर्घकाळ राहतो." परिणामी, स्नायूंमध्ये असंतुलन निर्माण होते, मणक्याच्या रचनेची झीज (Early Degeneration) लवकर सुरू होते आणि काही प्रकरणांमध्ये हे दुखणे मोठेपणीही कायम राहते.

किशोरवयीन मुलांमध्ये हाडांचा 'हा' त्रास वाढला

पूर्वी वर्षांनुवर्षांच्या श्रमानंतर प्रौढांमध्ये आढळणारे 'अर्ली डिस्क बल्ज' (Early Disc Bulges) किंवा 'सर्व्हायकल स्ट्रेन' (Cervical Strain) सारखे त्रास आता किशोरवयीन मुलांमध्ये वाढत आहेत. तज्ज्ञांच्या मते, शारीरिक हालचालींचा अभाव आणि मैदानी खेळांचा कमी झालेला सहभाग हे देखील याला कारणीभूत आहे.

वेळेवर उपाय आवश्यक

डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की, सुरुवातीच्या टप्प्यातील आसनासंबंधी (Posture-related) समस्या फिजिओथेरपी आणि जीवनशैलीतील बदलांनी बऱ्या होऊ शकतात.

प्रतिबंध हाच उत्तम उपाय

या समस्या टाळण्यासाठी तज्ज्ञांनी पालकांना खालील उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे:

  • स्क्रीनचा वापर मर्यादित ठेवा.

  • नियमित शारीरिक हालचाल आणि व्यायामाला प्रोत्साहन द्या.

  • अभ्यास करताना किंवा डिव्हाइस वापरताना मुले योग्य आणि सरळ आसनात बसतात, याची खात्री करा.

  • जर वेळीच याकडे लक्ष दिले नाही, तर आजची ही संपूर्ण पिढी दीर्घकाळच्या मणक्याच्या समस्यांसह मोठी होण्याची भीती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT