डॉ. आनंद ओक
या विकारांमध्ये पाठीचा कणा पुढे वाकल्यामुळे मान, पाठ अथवा कंबरेत वाकून चालावे लागते. काही वेळी यापैकी दोन्ही ठिकाणी म्हणजेच मान व कंबर यामध्ये वाकलेपणा आलेला असतो. सरळ होऊ लागल्यास वेदना होतात अशा विकारांपैकी असणारा एक विकार म्हणजे 'अँकिलॉजिंग स्पाँडिलायटीस.' अर्थात, मणक्यांतील जखडलेपणा.
पाठीच्या कण्यांत असणार्या दोन मणक्यांमधील सांध्याला सूज आल्यामुळे होणारा हा एक विकार आहे.
या आजाराचे नक्की कारण काय?
या आजाराचे निश्चित व स्पष्ट असे कारण अजूनही माहिती नाही; पण शरीराच्या प्रतिकारशक्ती संबंधित क्रियांमध्ये झालेला बिघाड मुख्यत्वे करून कारण असल्याचे आढळते. बर्याचदा आनुवंशिकतादेखील आढळून येते. प्रोस्टेग्रंथीला होणारा जंतुसंसर्ग, सोरीयासिस आणि अल्सरेटिव्ह कोलायटीस (वारंवार रक्तशेम पडणे) हे विकार अनेकदा या आजाराबरोबर आढळून येतात. आयुर्वेदीय शास्त्राप्रमाणे सांधे, स्नायुशिरांना त्रस्त करणारा हा एक 'वातविकार'च समजला जातो. सुरुवातीली लक्षणे आमवाताप्रमाणे आढळून येत असतात.
विकाराची प्रक्रिया नक्की कशी घडते?
पाठीच्या मणक्यांमधील सांध्यांमध्ये सर्वप्रथम दोष उत्पन्न होतो. सांध्यांमध्ये सूज आल्यामुळे दुखणे, जखडणे, भरून येणे असे त्रास होत असतात. माकडहाड व कमरेचे हाड यामधील सांध्यांना तेथील आवरणाला सूज येते. ही सूज वाढत जाऊन मणक्यामधील चकत्यांवर दुष्परिणाम होतो, या चकत्यांमधील मऊपणा लवचीकता कमी होऊ लागते. चकत्या कडक होऊ लागतात. कडकपणानंतर सांध्यांमधील स्नायूंना तसेच शीरांना व्यापू लागतो. कमरेमधील जखडलेपणा वाढू लागतो. काही काळ असाच गेल्यानंतर मणक्यांमधील चकत्या, स्नायू, शीरा यांचे हाडात रूपांतर होऊ लागते. पाठ, कंबरेमधील लवचीकपणा अधिकच कमी होतो.
या आजाराच्या तक्रारी सर्वसाधारणपणे तरुणपणात सुरू होणारा हा विकार असल्याचे आढळते. वयाच्या 15 ते 35 च्यामधील व्यक्तीत तो अधिक दिसून येतो. तसेच स्त्रियांपेक्षा पुरुषांत या आजाराचे प्रमाण अधिक्याने दिसते.
पाठीच्या कण्यात वेदना आणि जखडलेपणा, कडकपणा येणे हे मुख्य लक्षण असते. सुरुवातीच्या काळात कमी-अधिक होणारा हा त्रास साधारणपणे सकाळी उठल्या उठल्या जास्त जाणवतो. काही पेशंटना पायाचे घोटे, गुडघे, खुबे यामध्ये वेदना जाणवतात. कमरेतून मागून खुब्यातून खाली वेदना येणे म्हणजे 'सायटिका'चा त्रास काहींना होतो. विशेषतः, हा त्रास कधी डाव्या पायात तर कधी उजव्या पायात होत असतो. अंग जड वाटणे, निरुत्साह, अंग दुखणे, अशक्तपणा, मरगळणे, छातीत दुखणे या तक्रारी जाणवत असतात. शरीराचे वजन कमी झाल्याचे आढळते.
आजार जास्त वाढल्यानंतर छातीच्या मागील फासळ्या आणि मणक्यांमधील सांध्यांमध्ये जखडलेपणा आल्यामुळे तेथील हालचाल कमी होऊ लागल्याने छातीमध्ये जखडन वाढते. श्वसनास त्रास होतो.
आजार झाल्यानंतर काही जणांत जखडलेपणा वाढण्याचे काही दिवसांनी थांबते; पण क्वचित काही जणांत मात्र हाड वाळलेपणा वाढत जाऊन पाठीच्या कण्याचे एखाद्या कडक बांबूप्रमाणे स्वरूप बनते.
जखडलेपणा वाढत गेल्यास मनुष्य पाठीमागे वाकून चालू लागतो. सुरुवातीस माकडहाड व कंबरेच्या सांध्यांमधील वेदना असतात. दाब पडल्यावर दुखते. काही जणांत नंतरच्या काळात छातीच्या पुढील सांध्यांत, ओटीपोटात सर्वात खालील हाडाच्या सांध्यात दाब पडल्यावर वेदना होतात.
कमरेच्या मणक्यामधील सांधे, जखडल्यामुळे वाकण्याच्या, सरळ होण्याच्या क्रियेत अडचण येते.
तपासण्या : या विकारात कमरेच्या मणक्याचा एक्स-रे काढल्यावर त्यावरून काही वेळा निदान होते. तसेच रक्ताची एच.एल.ए.बी. ट्वेंटीसेवन या तपासणीमध्ये दोष आढळून येतो. काही वेळा एम.आर.आय. ही तपासणीदेखील केली जाते.
उपचार कसे केले जातात?
आधुनिक शास्त्राप्रमाणे या विकारात व्यायाम व वेदनाशामक सूज कमी करणारी औषधे एवढेच उपचार साधारणपणे केले जातात. परंतु, वारंवार सातत्याने वेदनाशामक औषधे घेतल्याने त्यांचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
आयुर्वेदीय उपचार कसे केले जातात?
या विकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुर्वेदीय उपचार अधिक उपयोगी आणि सुरक्षित असल्याचे जगभरात आढळून येत आहे.
आयुर्वेदीय उपचार म्हणजे काही गुग्गुळच्या गोळ्या, एखादा काढा घेणे, एखादे तेल लावणे असे मर्यादित स्वरूपात न करता आयुर्वेदीय 'सांघिक उपचार" केल्यास या विकारात अधिक आराम मिळतो.
सांघिक आयुर्वेदिक उपचार : अँकिलिझिंग स्पाँडिलायटीसचे निदान झालेल्या रुग्णाची नाडीपरीक्षा, प्रकृतीपरीक्षा, कोष्णपरीक्षा इ. अष्टविध परीक्षा केल्यानंतर तसेच रुग्णाचे वय, व्यवसाय, आहार, सवयी, दिवसभरातील कामाचा ताण, तो करत असलेला व्यायाम इत्यादी गोष्टींची सखोल माहिती घेऊन त्यानंतर विकारामुळे पाठीच्या कण्याच्या कोणकोणत्या मणक्यांच्या सांध्यांमध्ये दोष झाला आहे, याची तपासणी करून मगच सांघिक उपचार ठरविले जातात.
पोटात घेण्याची औषधे, पंचकर्म थेरपी, व्यायाम-योगासने, तसेच त्याने वागणुकीत करण्याचे बदल या चार गोष्टींचा सांघिक उपचारात समावेश असतो.
औषधे : सांध्यांमधील सूज कमी करणारी, स्नायूंच्या शीरांचा जखडलेपणा कमी करणारी, लवचीकता वाढविणारी, वातप्रकोप कमी करणारी तसेच प्रतिकारशक्ती वाढविणारी आणि शरीरबल व मनोबल वाढविणारी अशी संयुक्त औषधे दिली जातात. आयुर्वेदातील एरंड, निरगुडी, गुगुळ, दशमूळ, बला, शतावरी, त्रिफळा, अश्वगंधा, शुंठी, सहचर इ. वनौषधींचा तसेच कज्जली, माक्षिक भस्म, मंडुर भस्म, रोष्य, सुवर्ण इ. भस्मांचा गरजेप्रमाणे वापर करून ही औषधे केली जातात.
पंचकर्म थेरपी : विशिष्ट औषधी तेलांनी मान, पाठ, कंबर, खुबे, पाय यांना मसाज, संपूर्ण शरीराला वातशामक तेलाने मसाज करावा. 'तैलपिंड स्वेद' म्हणजे औषधी पाल्यांचे गोळे तेलात बुडवून त्यांनी शेक देणे, औषधी काढ्याच्या वाफेने प्रत्येक दुखणारा भाग शेकणे, हे केल्यानंतर विशेष औषधी तेल गुदद्वाराने आत सोडणे म्हणजेच तैलबस्ती, काही वेळा निरुहबस्ति नस्य, शिरोधारा, कटीबस्ति अशा उपचारांचा समावेश या पंचकर्म थेरपीमध्ये केला जातो. 7, 14 किंवा काही वेळी 21 वेळा हे उपचार केले जातात.
फायदा : औषधी व पंचकर्म थेरपी सुरू केल्यानंतर हळूहळू सूज, वेदना कमी होऊ लागतात. स्नायूंमधील कडकपणा होऊ लागते. हालचालींमध्ये सुलभता येऊ लागते. उपचारांची चिकाटी जास्त काळ ठेवावी लागते; पण ती चिकाटी ठेवल्यास वेदना आणखी कमी होऊन जखडणे खूपच कमी होऊन हालचालींमध्ये आश्चर्यकारक सुधारणा होऊन विकारांवर उत्तम नियंत्रण येऊ शकते.
योगा-व्यायाम : स्नायूंचा जखडलेपणा अधिक चांगला कमी होण्यासाठी तसेच लवचीकता वाढविण्यासाठी नियमित व्यायामाचे या विकारात अधिक महत्त्व आहे. उष्ण हवामान असताना पोहण्याचा व्यायाम करावा, सूर्यनमस्कार, भूजंगासन, चक्रासन, मर्कटासन, धनुरासना, उष्ट्रासन, उत्तानपादासन, कटीउत्तानासन, मार्जारासन, शलभासन, अर्धपवनमुक्तासन ही योगासने तज्ज्ञांकडून शिकून नियमित करावीत, श्वसनाचे व्यायाम आणि विविध प्राणायाम यांचाही उपयोग नित्य करावा.
वागणुकीतील बदल : थंड जागी काम करणे, थंड पाण्याची अंघोळ, ओले कपडे वापरणे, एसीमध्ये, पंख्याखाली सतत काम करणे, थंडीमध्येदेखील स्वेटर, ऊबदार कपडे न वापरणे, या गोष्टींमुळे हा आजार बळावल्याचे आढळते. त्यामुळे या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. शरीर शक्य तितके उबदार ठेवावे. शरीराला औषधीतेलाने नियमित मसाज करावा. आहारामध्ये दूध, तूप, बदाम, पांढरे तीळ, खजूर, डिंकलाडू इत्यादी स्निग्ध पदार्थांचा नियमित समावेश करावा.
थोडक्यात : कंबर आणि खुब्यामध्ये, माकडहाडामध्ये वारंवार वेदना व जखडलेपणा जाणवत असल्यास लगेचच तज्ज्ञाकडून तपासणी करून घ्यावी. अवघड असणारा 'अँकिलॉझिंग स्पाँडिलायटीस'चा विकार झाल्यास घाबरून न जाता नजीकच्या शुद्ध आयुर्वेदतज्ज्ञाकडून 'सांघिक' आयुर्वेद उपचारांचा वापर करून त्यावर उत्तम नियंत्रण मिळवावे.