Decision Fatigue file photo
आरोग्य

Decision Fatigue: सतत चिडचिड होतेय? मग तुम्हाला 'डिसिजन फटीग' हा मानसिक आजार असू शकतो; जाणून घ्या लक्षणे!

दिवस संपता संपता तुम्हाला कधी इतका थकवा जाणवला आहे का, की एखादा छोटासा निर्णय घेणेही डोंगर उचलण्यासारखे कठीण वाटते? अस का होतं आणि उपाय काय, जाणून घ्या सविस्तर

पुढारी वृत्तसेवा

Decision Fatigue

नवी दिल्ली: दररोज आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असंख्य निर्णय घेतो. नाश्त्याला काय खायचे, ऑफिसला कोणते कपडे घालून जायचे, कोणत्या ईमेलला आधी उत्तर द्यायचे किंवा संध्याकाळी कोणती वेब सीरिज पाहायची, असे सर्व छोटे-मोठे निर्णय आपली मानसिक ऊर्जा खर्च करत असतात.

दिवस संपता संपता तुम्हाला कधी इतका थकवा जाणवला आहे का, की एखादा छोटासा निर्णय घेणेही डोंगर उचलण्यासारखे कठीण वाटते? या मानसिक अवस्थेलाच वैद्यकीय भाषेत 'डिसिजन फटीग' असे म्हणतात.

काय आहे 'डिसिजन फटीग'?

'डिसिजन फटीग' म्हणजे निर्णय घेताना येणारा मानसिक थकवा. एखादी व्यक्ती दिवसभरात जितके जास्त निर्णय घेते, तितकी ती मानसिक आणि भावनिकदृष्ट्या थकलेली असते. याचा परिणाम असा होतो की, साध्या साध्या गोष्टींवरूनही त्या व्यक्तीचा गोंधळ उडतो आणि निर्णय घेणे कठीण होऊन बसते.

लक्षणे कशी ओळखाल?

डिसिजन फटीग ओळखणं थोडं अवघड असलं, तरी काही स्पष्ट संकेत दिसू शकतात—

टाळाटाळ करणे : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलण्याची सवय लागते.

घाईघाईत निर्णय घेणे : विचार न करता अचानक निर्णय घेणे, उदा. अनावश्यक ऑनलाइन खरेदी किंवा जंक फूड खाणे.

चिडचिड वाढणे : छोट्या प्रश्नांवरही पटकन राग येणे.

मानसिक गोंधळ : अनेक पर्यायांमुळे गोंधळून जाणे आणि योग्य काय हे ठरवता न येणे.

डिसिजन फटीग टाळण्यासाठी काय कराल?

रूटीन ठरवा : नाश्ता, व्यायाम किंवा कपड्यांची निवड यांसारखे रोजचे निर्णय आधीच ठरवून ठेवा, त्यामुळे रोज विचार करण्याची गरज पडणार नाही.

महत्त्वाचे निर्णय सकाळी घ्या : सकाळी मानसिक ऊर्जा सर्वाधिक असते, त्यामुळे कठीण आणि महत्त्वाची कामे दिवसाच्या सुरुवातीला पूर्ण करा.

पर्याय कमी ठेवा : जास्त पर्याय म्हणजे जास्त गोंधळ. खरेदी किंवा काम करताना मर्यादित पर्याय निवडा.

संध्याकाळी मोठे निर्णय टाळा : थकलेल्या अवस्थेत गुंतवणूक, करिअर किंवा नातेसंबंधांबाबत मोठे निर्णय घेऊ नका.

मील प्लॅनिंग करा : पुढील दिवसाच्या जेवणाची तयारी आधीच केल्यास वेळ आणि मानसिक ऊर्जा दोन्ही वाचतात.

दिवसभरातील छोट्या निर्णयांचा परिणाम आपल्या मनावर किती खोलवर होतो, हे समजून घेतल्यास ‘डिसिजन फटीग’ टाळणं सोपं जाऊ शकतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT