कोविड-१९ विषाणू पुन्हा डोके वर काढत आहे. भारतात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १,०१० वर पोहोचली असून केरळ, महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात असले तरी, NB.1.8.1, LF.7 आणि नव्याने उदयास आलेला XFG या व्हेरियंट्सवर सतत लक्ष ठेवले जात आहे. या व्हेरियंट्समधील काहींना "व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट" म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सध्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार हे नवीन व्हेरियंट्स अधिक वेगाने पसरण्याची क्षमता बाळगतात. NB.1.8.1 व्हेरियंटमध्ये ‘ग्रोथ अॅडव्हान्टेज’ म्हणजे इतरांपेक्षा अधिक जलद पसरण्याची ताकद दिसून येते. LF.7 व्हेरियंटच्या परिणामकारकतेवर WHO लक्ष ठेवून आहे. XFG व्हेरियंटबाबत तपशील अद्याप समोर येत असला तरी त्याच्या उपस्थितीने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे.
या नव्या व्हेरियंट्सची लक्षणे ओमिक्रॉनसारखीच असून सौम्य स्वरूपाची आहेत. घशात खवखव, थकवा, सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे दिसून येतात. मात्र, जुन्या व्हेरियंट्समध्ये दिसणारा चव आणि वास न जाणे हा लक्षण आता फारसा दिसत नाही. विशेषतः JN.1 व्हेरियंटमध्ये सौम्य पण सातत्याने ताप राहणे, भूक मंदावणे, अतिसार, पोटात गडबड यासारखी लक्षणे अधिक स्पष्ट आहेत. त्यामुळे हे लक्षण केवळ थकवा वाटतोय म्हणून दुर्लक्षित करू नये. वेळेत तपासणी आणि विलगीकरण केल्यास प्रसार टाळता येतो.
सुदैवाने सध्याचे लसीकरण आणि बूस्टर डोस हे नवीन व्हेरियंट्सवरही परिणामकारक ठरत आहेत. NB.1.8.1 आणि LF.7 या व्हेरियंट्समध्ये लसीचा परिणाम फारसा कमी झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता मास्क घालणे, गर्दी टाळणे, हात धुणे आणि लसीकरण पूर्ण करणे हे मूलभूत नियम पाळणे आवश्यक आहे. जर कोणतीही लक्षणे जाणवली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरेल.