आरोग्य

Conjunctivitis Eye Infection | पसरतेय डोळे येण्याची साथ, संसर्ग टाळण्यासाठी अशी ‘घ्या’ काळजी

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या डोळे येण्याची साथ आली आहे. डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह आणि डोळ्यांच्या संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर डोळ्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. डोळ्यांचा विषाणुजन्य संसर्गात (डोळे येणे) वाढ होत आहे. याबद्दल काळजी घ्यायला हवी. (Conjunctivitis Eye Infection)

जेव्हा तुम्ही दूषित पृष्ठभागांना स्पर्श केल्यानंतर तुमच्या डोळ्याला हात लावता तेव्हा हा संसर्ग थेट संपर्काने पसरतो. यामुळे जेव्हा तुमचे डोळे येतात तेव्हा एकमेकांचा टॉवेल किंवा वैयक्तिक वस्तू न वापरण्याचा सल्ला दिला जातो. जर तुमचा दुसऱ्या रुग्णाच्या डोळ्यातील स्रावांशी संपर्क आला असेल तर तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. अशावेळी पापण्या खूप सूजल्या जाऊ शकतात. तसेच डोळ्यांमधून पाण्याचा स्त्राव, लालसरपणा, डोळ्याच्या दाह होणे आदी लक्षणे दिसून येतात.

दिल्लीसह महाराष्ट्र आणि अन्य काही राज्यात डोळे येण्याची साथ आली आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी आणि शिरूर येथील पिंपळे जगताप येथे डोळे आलेले रुग्ण आढळून आले आहेत. अजूनही रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक भागात उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात डोळे येण्याची विषाणुजन्य साथ सुरू होते. डोळ्यांचा विषाणुजन्य संसर्ग हा अ‍ॅडिनो व्हायरसमुळे होतो. डोळ्यांचा विषाणुजन्य संसर्ग हा सौम्य प्रकारचा संसर्ग असला, तरी देखील याबाबत आरोग्य विभागाने आणि नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे असे जिल्हा परिषदेने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. (Conjunctivitis Eye Infection)

अशी ही घ्या काळजी

  • डोळे स्वच्छ पाण्याने सतत धुवावे.
  • चष्म्याचा वापर करावा.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचा वापर करावा.
  • कचऱ्यावर बसणाऱ्या डोळ्यांची साथ पसरवतात. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवावा.
  • डोळ्याच्या संसर्गाचा प्रसार कमी करण्यासाठी वारंवार साबणाने आणि पाण्याने हात धुवायला हवेत.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने आय ड्रॉप्सचा वापर करा.
  • त्याचा प्रसार रोखण्यासाठी योग्य स्वच्छता आवश्यक आहे.
  • ही आहेत लक्षणे

    डोळ्यांमधून पाण्याचा स्त्राव, लालसरपणा, डोळ्याच्या दाह होणे. पापण्यांना सूज येणे.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT