अनेक महिलांना हा प्रश्न सतावतो की, जर त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल, तर त्या आपल्या बाळाला स्तनपान देऊ शकतात का? या विषयावर पुण्याच्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. अश्विनी राठोड यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे.
डॉ. अश्विनी राठोड यांच्या मते, “ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांमध्ये कीमोथेरपी, रेडिएशन आणि काही विशिष्ट औषधांचा समावेश होतो, जे स्तनपानाद्वारे बाळाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. ही औषधे थेट दुधात मिसळू शकतात आणि त्यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.”
त्यांनी पुढे सांगितले की, "कॅन्सरग्रस्त महिलांचे आरोग्य आधीच खालावलेले असते, त्यामुळे थकवा, मळमळ, अशक्तपणा येतो. याचा दुध उत्पादनावर आणि बाळाची काळजी घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. अशा वेळी आईने प्रथम स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे."
अभिनेत्री दीपिका कक्कडने नुकत्याच एका व्हिडिओमध्ये सांगितले की, तिच्या लिव्हर कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर तिने आपल्या दोन वर्षांच्या मुलाला अचानक स्तनपान देणे थांबवले. ती म्हणाली, "मला एकाच रात्रीत बाळाला दूध बंद करावं लागलं, मी खूप रडले. हा निर्णय कठीण होता, पण गरजेचा होता." जर स्तनपान शक्य नसेल, तर डोनर मिल्क किंवा फॉर्म्युला दूध हे पर्याय निवडावेत. मुख्य उद्देश बाळाला पोषण मिळणे हा असावा.
WebMed नुसार, जर महिला स्तनपान देऊ इच्छित असेल, तर तिने आपल्या डॉक्टरांशी सल्ला घ्यावा. कीमोथेरपी, हार्मोन थेरपी आणि टार्गेट थेरपीसारख्या उपचारांदरम्यान स्तनपान टाळावं लागतं, कारण यामधील औषधं दुधात जातात.
काही प्रकरणांमध्ये सर्जरीपूर्वी सुद्धा डॉक्टर स्तनपान थांबवण्याचा सल्ला देतात, जेणेकरून रक्तप्रवाह कमी होऊन शस्त्रक्रिया सुलभ होते. तसेच, स्तनदूध स्तनात साचल्यामुळे होणाऱ्या संसर्गाचा धोका देखील कमी होतो.
त्यांच्यानुसार, स्तन शस्त्रक्रिया आणि रेडिएशन झाल्यानंतर त्या स्तनातून दूध उत्पादनात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे काही महिलांना त्या बाजूने स्तनपान करताना त्रास होतो. मात्र, जर दुसऱ्या स्तनातून दूध येत असेल, तर स्तनपान शक्य होते. औषधे घेत असताना स्तनपान सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.