World Stroke Day: आपला मेंदू हा आपल्या शरीराची कंट्रोल सिस्टम असते. आपले चालणे बोलणे, स्मरणशक्ती, शरीराचा बॅलेन्स या सर्व गोष्टी मेंदू कंट्रोल करत असतो. ज्यावेळी आपल्या मेंदूपर्यंत जाणारा रक्तपुरवठा अचानक थांबला किंवा एखादी नस फुटली तर काही मिनिटातच ब्रेन सेल्स मृत होण्यास सुरूवात होते. वैद्यकीय भाषेत याला स्ट्रोक असे म्हणतात.
ही एक मोठी वैद्यकीय इमर्जन्सी आहे. मात्र वेळीच याची लक्षणे ओळखली तर रूग्णाचा जीवच वाचवता येत नाही तर आयुष्यभराचे अपंगत्व देखील कमी केलं जाऊ शकतं. चला तर मग ब्रेन स्ट्रोकची सुरूवातीची लक्षणे काय असतात याबाबत जाऊन घेऊयात.
चेहरा किंवा शरीराच्या एक भाग अशक्त जाणवणे
ज्यावेळी रूग्णाला स्ट्रोक येणार असतो त्यावेळी त्याचा चेहरा एका बाजूला लटकू शकतो. त्याला सरळ हसता येत नाही. त्याचबरोबर हात आणि पायात अशक्तपणा जाणवतो. ते सुन्न पडू लागतात. जर आपल्याला शंका आली तर आपण रूग्णाला हासण्यास आणि आपले दोन्ही हात उचलण्यास सांगू शकतो. जर एक भाग कमजोर दिसू लागला तर लगेचच वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे.
बोलताना अडचण
जर अचानक तुमचं बोलणं अडखळू लागलं. योग्य शब्दाची निवड करणे जमत नसेल. वेगळीच वाक्ये बोलणे, जे बोलणे समजत नाहीये तर ती धोक्याची घंटा आहे. व्यक्ती पूर्णपणे जागा असताना तो बोलताना संघर्ष करू लागला तर हा बदल ताण समजून दुर्लक्षित करू नका.
डोळ्याची ज्योती अंधुक होणे
जर अचानक डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. एकच गोष्ट दोन दोन दिसू लागल्या. किंवा डोळ्यांची ज्योती अचानक गेली. तर हा संकेत मेंदू किंवा त्याच्या रक्त पुरवठ्यात काहीतरी गंभीर अडचण निर्माण झाली असल्याचा थेट संकेत आहे.
तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे बॅलेन्स जाणे
अचानक होणारी तीव्र डोकेदुखी. जी अचानक तीव्र होत जाते. हा मेंदूमध्ये किंवा त्याच्या जवळपास होत असलेल्या रक्तस्त्रावाकडे इशारा करते. याचबरोबर अचानक चक्कर येणे, अचानक बॅलेन्स जाणे, कोणतेही कारण नसातना खाली कोसळले हे न्युरोलॉजिकल समस्येचे लक्षण आहे.
अचानक स्मरणशक्ती जाणे
जर एखादा व्यक्ती अचानक गोंधळत असेल, आपल्या आसपासच्या गोष्टी समजू शकत नसेल आणि त्याची स्मरणशक्ती अचानक जात असेल तर हे स्ट्रोकचे लक्षण आहे. हे लक्षण सहजासहजी लक्षात येत नाही. जर कुटुंबातील लोकांना रूग्ण अजब वर्तन करत आहे. आपले रोजचे सोपे काम करू शकत नसेल तर कोणताही विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधवा.
F – Face (चेहरा): चेहऱ्याचा एक भाग लटकला आहे का?
A – Arms (हात): एक हात कमजोर (लुळा) पडला आहे का?
S – Speech (बोलणे): आवाज स्पष्ट येत नाहीये का? बोलताना अडचण येत आहे का?
T – Time (वेळ): वेळ न दवडता त्वरित वैद्यकीय मदत घ्या.
भारतात स्ट्रोकची शंका असेल तर इमर्जन्सीसाठी त्वरित ११२ नंबर डायल करा.
ही लक्षणे कोणत्या वेळी सुरू झाली याची नोंद ठेवा
लक्षणे दिसल्यावर ती आपोआप ठीक होतील याची वाट पाहू नका
रूग्णवाहिका उपलब्ध असेल तर रूग्णाला त्याची गाडी घेऊन जाऊ देऊ नका.
जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत रूग्णाला खाण्या पिण्याच्या गोष्टी देऊ नका.
विशेष म्हणजे ही सर्व लक्षणे काही मिनिटांनी गायब झाली तरी रूग्णाला रूग्णालयात दाखल करून चेकअप करून घ्या. कारण हा मिनी स्ट्रोक किंवा ट्रांजिएट इस्केमिक अटॅक असू शकतो. ही भविष्यातील मोठ्या स्ट्रोकची चेतावणी असू शकते.