

नाशिक : बदलती जीवनशैली, ताणतुरी झोप आणि बैठी जीवनशैली आदी कारणांमुळे पक्षघाताचा झटका (स्ट्रोक) येण्याचे प्रमाण वाढले आहे. एका सर्वेक्षणाअंती २५ वर्षांवरील प्रत्येक ४ पैकी १ व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात पक्षाघाताचा झटका (स्ट्रोक) येण्याचा धोका आहे. पुर्वी हे प्रमाण ६ पैकी एक असे होते. मात्र, आता ते आणखी कमी झाल्याने, जागतिक आरोग्य संघटनेने यावर पुरेशी जनजागृती करण्यासाठी बुधवारी (दि.२९) साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक स्ट्रोक डेनिमित्त 'एव्हरी मिनिट काऊंट्स' ही थीम ठेवली आहे.
थेट मेंदूवर आघात करणाऱ्या स्ट्रोकचे प्रमाण पूर्वी साठीत सर्वाधिक होते. आता एेन तारुण्यात स्ट्रोक येत आहे. भारतात वयाच्या पंचविसीत स्ट्रोक येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. स्ट्रोक म्हणजे मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा अचानक थांबणे किंवा कमी होणे. त्यामुळे मेंदूतील पेशींना ऑक्सिजन मिळत नाही आणि काही क्षणांत त्या मरू लागतात. ही अवस्था अत्यंत गंभीर असून वेळीच वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत तर जीव गमवावा लागू शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात दरवर्षी सुमारे ७३ लाख लोकांचा मृत्यू स्ट्रोकमुळे होतो, तर भारतात दर चार मिनिटांनी एका व्यक्तीला स्ट्रोक येतो असा अंदाज आहे. वाढता ताणतणाव, धूम्रपान, व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार आणि उच्च रक्तदाब ही यामागची प्रमुख कारणे आहेत. ग्रामीण भागात उपचार सुविधा कमी असल्याने स्ट्रोकच्या रुग्णांना 'गोल्डन अवर' अर्थात पहिल्या साडे चार तासात उपचार मिळणे आवश्यक असते.
वैद्यकीय आकडेवारीनुसार, २०१० पासून १५ ते ३९ वयोगटातील लोकांमध्ये इस्केमिक स्ट्रोकच्या (रक्तवाहिनीतील अडथळ्यामुळे होणारा स्ट्रोक) घटनांमध्ये दरवर्षी १.१ टक्क्यांनी वाढ होत आहे. विशेषतः ३० ते ३९ वयोगटातील लोकांमध्ये ही वाढ अधिक दिसून येत आहे. प्रगत उपचारपद्धती आली असली तरी, स्ट्रोक टाळण्यासाठी नियमित रक्तदाब, साखर आणि कोलेस्टेरॉल तपासणे, दररोज व्यायाम करणे, धूम्रपान व मद्यसेवन टाळणे तसेच ताणमुक्त जीवन जगणे आवश्यक आहे.
हे सूत्र लक्षात ठेवा
एफ (फेस) - चेहरा झुकतो का?
ए (आर्म) - हात उचलताना दुर्बलता येते का?
एस (स्पीच) - बोलताना अडचण येते का?
टी (टाइम) - तत्काळ रुग्णालयात जा.
जशी हृदयाची ॲन्जिओग्राफी आणि ॲन्जिओप्लास्टी होते, तशीच मेंदुचीही ॲन्जिओग्रीफी व ॲन्जिओप्लास्टी केली जाते. ब्रेन ॲन्जिओग्राफीच्या माध्यमातून निदान झाल्यानंतर पक्षघाताच्या रुग्णावर शस्त्रक्रिया करणे सोपे होते.
डॉ. श्रीपाल शहा, इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट व स्ट्रोक स्पेशालिस्ट
गडचिरोली जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण अधिक
स्ट्रोकमुळे मृत्यू येण्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे. एका सर्वेक्षणानुसार, गडचिरोली जिल्ह्यात हे प्रमाण १४.३ टक्के इतके आहे. दुसऱ्या एका सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात वृद्ध लोकांमध्ये निदान झालेल्या स्ट्रोकचे प्रमाण २.६ टक्के आहे. गंभीर बाब म्हणजे आता २५ ते ३५ वयोगटामध्ये स्ट्रोकचे प्रमाण वाढत असून, बदलती जीवनशैली त्यास कारणीभूत आहे.
रक्सस्त्राव कुठल्या मेंदूच्या भागात आहे, आकार किती आहे, रुग्णाचे वय आणि शारीरिक परिस्थिती यावर पेशंटची लक्षणे, उपचार आणि रिकव्हरी किंवा मृत्यू होणार ते अवलंबून असते. मेंदूचा एखादा भाग डॅमेज झाल्यावर तो पुन्हा पूर्ववत करता येत नाही.
डॉ. समीर फुटाणे, मेंदू व मणका शल्यविशारद