आरोग्य

रक्ताची गुठळी होणे म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे, उपचार

अनुराधा कोरवी

[author title="डॉ. महेश बरामदे" image="http://"][/author]

आपल्या शरीरात रक्त गोठणे अथवा त्याची गुठळी बनणे आणि पुन्हा ती विरघळणे ही प्रक्रिया सहज रूपात सुरू असते. रक्ताची गुठळी निसर्गतः बनण्याच्या या वैशिष्ट्यामुळेच जखम झाल्यानंतर रक्त वाहणे आपोआप थांबते. जखम बरी झाल्यानंतर या गुठळ्या विरघळूनही जातात; परंतु ज्यावेळी या प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण होते, तेव्हा रक्ताची गुठळी तशीच राहते. दीर्घकाळ यावर उपचार न झाल्यास ते गंभीर रोगाचे रूप धारण करू शकते.

ब्लड क्लॉटिंग अर्थात रक्ताची गुठळी होणे म्हणजे काय, ते कसे होते, त्याची निर्मिती आणि त्यापासून बचाव कसा करता येऊ शकतो, याबाबत जाणून घेऊ.

आपल्या शरीरात रक्तवाहिन्यांद्वारे निरंतनपणाने रक्त वाहत असते. सतत वाहणारे हे रक्त हृदयापर्यंत जाते आणि पंपिंगद्वारे शुद्ध झाल्यानंतर शरीराच्या अन्य मुख्य अवयवांकडे आणि पेशींपर्यंत पोहोचते. हेच रक्त पुन्हा धमन्यांद्वारे हृदयाकडे पुन्हा पाठवले जाते. हृदयापर्यंत पाठविण्याच्या या प्रक्रियेत धमन्या आकुंचन पावतात; कारण शरीराच्या पेशी रक्त परत पाठवण्यासाठी ताकद लावतात. याच वाहत्या रक्तामध्ये कधी-कधी क्लॉट म्हणजेच गुठळी बनते.

ही रक्ताची गुठळी आपोआपच बनते. सामान्य प्रक्रियेमध्ये ही गुठळी क्षतीग्रस्त नलिकांची दुरुस्ती करण्याचे कामदेखील करते. असे झाले नाही तर जखम झाल्यानंतर शरीरातील रक्ताचे वाहणे रोखणे अवघड होऊन बसेल. रक्तातील प्लाझ्मामध्ये प्लेटलेटस् आणि प्रोटिन्स असतात. जखम झालेल्या ठिकाणी ते रक्ताच्या गुठळ्या निर्माण करून रक्त वाहणे रोखतात. सामान्यपणे जखम बरी झाल्यानंतर रक्ताची गुठळी आपोआप विरघळते; पण रक्ताची गुठळी न विरघळणे आणि दीर्घकाळापर्यंत तशीच राहणे आरोग्यासाठी धोकादायक असते. त्यासाठी तपासणी आणि उपचाराची गरज असते. उपचार न करता दीर्घकाळ तसेच राहिल्यास रक्ताच्या गुठळ्या धमन्या अथवा नसांमध्ये जातात आणि शरीरातील कुठल्याही भागात म्हणजे डोळे, हृदय, मेंदू, फुफ्फुसे, किडनी इत्यादी ठिकाणी जाऊन त्या अवयवांचे काम बाधित करतात.

डोळे

रक्ताच्या गुठळ्या शरीराच्या कुठल्याही भागात जाऊ शकतात. ही गुठळी रक्तप्रवाहाद्वारे डोळ्यामध्ये पोहोचू शकते. ही गुठळी आपल्याला दिसेल की नाही, हे ती डोळ्यातील कुठल्या भागात आहे, यावर अवलंबून असते. यामुळे डोळ्यांमध्ये वेदना आणि नजर अस्पष्ट होणे ही लक्षणे दिसतात. सामान्य डोळ्यांच्या तुलनेत प्रभावित डोळ्याची पुतळी आकाराने वेगळी दिसते.

हायफेमासारख्या स्थितीमध्ये कॉर्निया अथवा पुतळीमध्ये रक्त येते. डोळ्यामध्ये रक्ताची गुठळी बघून बहुतेक वेळा वाटते की, डोळ्यात जखम झाली आहे. काही वेळा या गुठळ्या आपोआपच बर्‍या होतात; पण तरीही याबाबत वेळीच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

मेंदू

मेंदूमध्ये रक्ताची गुठळी असल्यास या गुठळीचा परिणाम जोपर्यंत शारीरिक क्रिया, हालचालींवर दिसत नाही, तोपर्यंत त्याची चटकन माहिती होत नाही. या संकेतांमध्ये संभावित पक्षाघात, बोलण्यास व समजण्यास अडचण, चक्कर येणे इत्यादीचा समावेश होतो. अनेकदा उलटीदेखील येऊ लागते. परिस्थिती गंभीर असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.

हृदय किंवा फुफ्फुसे

ज्यावेळी फुफ्फुसे किंवा हृदयामध्ये रक्ताची गुठळी बनते, तेव्हा त्याची लक्षणे हृदयाचा झटका येण्यासारखीच असतात. छातीच्या भागात वेदना होतात. श्वास घ्यायला अडचण येऊ लागते आणि जबडा किंवा मानेमध्ये वेदनेचा अनुभव येऊ शकतो. पाठ आणि हातांमध्येदेखील वेदना होऊ शकतात. तसेच हृदयात गुठळी बनणे हे हृदयाचा झटका येण्याचे कारण बनू शकते.

पाय आणि हात

जर रक्ताची गुठळी पाय किंवा हातामध्ये बनली तर ज्या ठिकाणी ती बनली आहे, त्याच्या खालच्या भागात आणि हाताच्या कुठल्याही भागात सूज येऊ शकते. पाय आणि हाताच्या गुठळ्यांच्या सामान्य लक्षणांमध्ये त्वचेवर लाली येणे, अधिक गरम होणे आणि अस्वस्थता इत्यादी लक्षणांचा समावेश होतो.

या समस्येसाठी अ‍ॅन्टिकोग्युलँटस् म्हणजे गुठळी बनण्यास रोखणारे औषध दिले जाते. क्लॉट ब्लस्टर्स म्हणजे रक्ताची गुठळी विरघळवणारे औषध दिले जाते. शिरेतून किंवा धमनीतून साकळलेले रक्त वा गुठळी काढणे, यासारखे वेगवेगळे उपचार केले जातात.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT