बीटा-एचपीव्ही हा एक सामान्य मानला जाणारा विषाणू असला, तरी तो प्रत्यक्षात अत्यंत धोकादायक ठरू शकतो. अलीकडील संशोधनातून स्पष्ट झाले आहे की, हा व्हायरस थेट मानवी त्वचेच्या पेशींवर नियंत्रण मिळवून कर्करोग निर्माण करू शकतो. विशेषतः, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणार्यांसाठी तो अधिक धोकादायक ठरू शकतो.
डॉ. मनोज शिंगाडे
अलीकडेच, 34 वर्षांच्या एका महिलेला आलेला अनुभव सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे. तिच्या कपाळावर त्वचेचा कर्करोग झाला होता. शस्त्रक्रियेनंतरही तो वारंवार परत येत होता. ना शस्त्रक्रिया, ना इम्युनोथेरपी कशाचाच त्यावर परिणाम होत नव्हता. अखेर, शास्त्रज्ञांनी तिचे डीएनए तपासले तेव्हा लक्षात आले की, बीटा-एचपीव्ही व्हायरस तिच्या कर्करोगग्रस्त पेशींच्या डीएनएमध्ये शिरून तेथे आपली प्रथिने तयार करत होता आणि त्यामुळे कर्करोग वेगाने वाढत होता.
यातील सर्वात धोकादायक बाब म्हणजे आजवर हा विषाणू केवळ सूर्यप्रकाशामुळे होणारी त्वचेची हानी तीव्र करण्यास जबाबदार असल्याचे मानले जात होते; पण आता सिद्ध झाले आहे की, हा विषाणू स्वतःहूनही कर्करोग निर्माण करण्यात सक्रिय भूमिका बजावतो.
सदर महिलेच्या शरीरात एक आनुवंशिक आजार होता आणि त्यामुळे तिच्या रोगप्रतिकारक पेशी (टी-सेल्स) व्हायरसशी लढू शकत नव्हत्या. यामुळे व्हायरस तिच्या शरीरात निर्भयपणे पसरला आणि कर्करोगाला चालना दिली. अखेरीस तिला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावे लागले. त्यानंतर तिच्या टी-सेल्स पुन्हा निरोगी झाल्या. कर्करोग तसेच एचपीव्हीशी संबंधित सर्व समस्या दूर झाल्या आणि तीन वर्षांपर्यंत पुन्हा संसर्ग झाला नाही.
ही शोधमोहीम म्हणजे एक प्रकारचा इशारा आहे. कर्करोगाच्या उपचारामध्ये प्रत्येक रुग्णाची प्रकृती आणि स्थिती लक्षात घेऊन वेगळ्या प्रकारे उपाययोजना करणे किती आवश्यक आहे, हेही यातून लक्षात येते.