आरोग्य

Benefits of deep breathing | उत्तम आरोग्यासाठी दीर्घ श्वसन महत्त्वाचे, जाणून घ्या त्याचे फायदे

अनुराधा कोरवी

आयुर्वेदिक संशोधनानुसार आपण आपल्या फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेचा पूर्ण वापर करीतच नाही. त्यामुळे आपल्या शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही व परिणामी आपल्या तब्येतीवरही त्याचा परिणाम होतो. आपण किती हळू व वेगाने श्वास घेतो यावर आपले आयुर्मान अवलंबून असते. आपले उत्तम आरोग्य, संतुलित मनःस्थिती व दीर्घायुष्य यासाठी दीर्घ श्वसन करणे खूप महत्त्वाचे आहे. (Benefits of deep breathing) 

संबंधित बातम्या 

दीर्घ श्वसन करण्याचीही एक शास्त्रशुद्ध पद्धती आहे. याद्वारे श्वसन केल्यास आपली मनःस्थिती एकदम प्रसन्न होते व शरीरासही त्याचा फायदा होतो. इतर शिस्तीच्या सवयींप्रमाणेच दीर्घ श्वसन करण्याचीही शरीराला सवय लावावी लागते. यासाठी रोज थोडा थोडा सराव करणे फायदेशीर ठरते. सर्वप्रथम ताठ बसावे. यानंतर नाकाने हळूहळू प्रथम पोटात हवा भरून, नंतर छातीत हवा भरावी. या सगळ्यादरम्यान हळूहळू 1 ते 5 आकडे मोजावेत. श्वास संपूर्ण आत भरल्यानंतर थोडावेळ रोखून धरावा व 1 ते 3 आकडे मोजावेत. यानंतर श्वास बाहेर सोडावा व यादरम्यान पुन्हा 1 ते 5 असे आकडे मोजावेत. या सगळ्या दरम्यान श्वास हळूहळू आत-बाहेर करीत आहे याकडे लक्ष द्यावे. सुरुवातीला आपले मन आपल्या श्वासावरून हटेल; पण सरावाने हळूहळू ते जमायला लागेल.

दीर्घ श्वसनाचा फायदा मिळवण्यासाठी आपल्या दैनंदिन वेळापत्रकातून या श्वसनाच्या सरावासाठी खास वेळ काढावा. आपल्या दिवसातील 10 मिनिटांचा वेळ काढावा व दिवसातून दोनवेळा हा सराव करावा. आपल्यासोबत आपल्या कुटुंबातील व्यक्तींना या व्यायामासाठी प्रोत्साहित केल्यास आपल्यासोबतच आपल्या कुटुंबीयांनाही याचा फायदा होतो.

उथळ श्वसनाचे तोटे

आपले श्वसन उथळ असेल, तर त्याचा आपल्या शरीराला खूप तोटा होतो. उथळ श्वसनामुळे आपल्या फुफ्फुसाच्या क्षमतेचा पूर्ण वापर होत नाही. त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते व श्वसनाचे अनेक रोग होण्याचा धोका निर्माण होतो. याशिवाय उथळ श्वसनामुळे आपल्या शरीराची ऑक्सिजनची गरज पूर्ण होत नाही, त्यामुळे शरीरांतर्गत विकास व आरोग्य यांना अडथळा निर्माण होतो. आपल्या शरीरातील रक्त निरोगी राहण्यासाठी व शरीरातील प्रत्येक भागापर्यंत व्यवस्थित रक्तपुरवठा होण्यासाठी दीर्घ श्वसनाद्वारे शरीरात ऑक्सिजन जाणे महत्त्वाचे असते.

श्वसनाचा आपल्या मनःस्थितीशी खूप जवळचा संबंध असतो. सतत अस्वस्थता असणे, एकाग्रतेचा अभाव, गोंधळ उडणे इत्यादी मानसिक समस्यांवर दीर्घ श्वसन हा रामबाण उपाय आहे. आपण अस्वस्थ झाल्यावर आपल्या श्वसनाचा वेग वाढतो. त्याचप्रमाणे उलट विचार केल्यास वेगाने श्वसन केल्यास अस्वस्थता निर्माण होते.

दीर्घ श्वसनाचे फायदे- Benefits of deep breathing

दीर्घ श्वसनाचे फायदे अनेक आहेत. यातील काही फायदे पुढीलप्रमाणे:

आपल्या शरीरातील 70 टक्के विषारी घटक हे श्वसनाद्वारे बाहेर टाकले जातात. आपण दीर्घ श्वसन केल्यास आपल्या शरीरातील विषारी घटक मोठ्या प्रमाणात बाहेर टाकले जातात. यामुळे शरीरातील बाकी संस्थांचे हे काम वाचते व आपले आरोग्य उत्तम राहते.

दीर्घ श्वसनामुळे आपल्या मेंदूवरील ताणही कमी होतो. आपण अस्वस्थ असल्यावर आपला श्वास वाढतो व याउलट आपण शांत असल्यावर हा वेग थोडा कमी होतो. त्यामुळे थकवा आल्यास किंवा ताण आल्यास ताठ बसावे व दीर्घ श्वसन करावे. यामुळे ताण काही वेळातच हलका होईल.

दीर्घ श्वसनामुळे आपले शरीरही आरामदायक स्थितीत येते. त्यामुळे शरीरातील स्नायूंना आलेला अनावश्यक ताण नाहीसा होतो व स्नायू सैलावतात.

दीर्घ श्वसनामुळे आपल्या पचनसंस्थेसही फायदा होतो. दीर्घ श्वसनामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो व त्यामुळे आपल्या शरीरात रक्तप्रवाह वाढून आपल्या शरीरातील प्रत्येक भागाला त्याचा फायदा होतो व त्याचा विकास होतो. खासकरून पचन क्रिया सुधारण्यासाठी दीर्घ श्वसनाचा खूप फायदा होतो.

दीर्घ श्वसनामुळे आपल्या फुफ्फुसांचा पूर्ण वापर होतो, त्यामुळे आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते.

श्वसन दीर्घ झाल्यामुळे रक्तात ऑक्सिजन मिसळण्यासाठी व शरीरात रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयाला जास्त कष्ट करावे लागत नाहीत. त्यामुळे हृदयावर ताण येत नाही व त्याचे आरोग्य उत्तम राहते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT