धोका बुरशीजन्य आजारांचा File Photo
आरोग्य

Skin Care Tips| धोका बुरशीजन्य आजारांचा

पुढारी वृत्तसेवा

डॉ. संतोष मोरे

पावसाळा म्हटलं की, विविध आजारांचे प्रमाण वाढते त्यातही जीवाणूजन्य, बुरशीजन्य आजारांचे प्रमाण अधिक असते. बुरशीजन्य संसर्ग हा पायांची बोटे, कंबर, मांड्या तसेच डोळ्यांवरही परिणाम करतो. त्यामुळे खाज येण्यापासून ते व्हजायनल यीस्ट म्हणजे योनीमार्गातला संसर्ग तसेच त्वचारोग होण्याचा धोका वाढतो.

अॅथलिट फूट : हा एक अत्यंत सर्वसाधारणपणे आढळणारा बुरशीजन्य संसर्ग आहे. जो पायाच्या त्वचेला होतो. विशेषतः पायाच्या बोटांच्या बेचक्यांमध्ये हा संसर्ग होतो. पावसाळ्यात सतत बूट घालत असाल, तर पाय ओलसर राहतात. अनेकदा घाम व पावसाळ्याचे पाणी यांच्या एकत्रित संपर्कामुळे हा संसर्ग होण्याची शक्यता असते.

इसब : बुरशीमुळे त्वचेला होणारा गंभीर संसर्ग म्हणजे इसब. त्यामध्ये त्वचेवर गोलाकार, लाल आणि खाज येणारे डाग पडतात. शरीराच्या इतर भागांवरही हे होऊ शकतात. हा संसर्गजन्य आजार आहे.

जॉक इच आणि फंगल केराटायटिस : हे दोन्हीही बुरशीजन्य आजार आहेत. जॉक इचमध्ये जांघेत खाज येते. यामध्ये कंबर, मांड्या आणि नितंबांवर बुरशीजन्य संसर्ग दिसून येतो. यात त्वचेला खाज येणे, ती लालसर होणे आणि पुरळ येणे अशी बाह्य लक्षणे दिसतात. तर फंगल केराटायटिसमध्ये डोळ्याच्या कॉर्नियावर परिणाम होतो. वेळीच उपचार न केल्यास दृष्टीसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.

नखांमध्ये संसर्ग : याला ओनिकोमाइकोसिस असे म्हणतात. पावसाळ्यात नखांत संसर्ग होण्याचा धोका वाढतो. सर्वसाधारणपणे पायांच्या बोटांमध्ये, नखांमध्ये हा संसर्ग होतो. त्यामुळे नखे जाड होणे, त्यांचा रंग खराब होणे आणि नखे तुटणे, असे त्रास होतात.

कैंडिडीओसिस : कैंडिडा बुरशीमुळे निर्माण होणारी आरोग्यस्थिती म्हणजे हा संसर्ग. एकप्रकराच्या बुरशीचा हा संसर्ग असतो. शरीराच्या विविध भागांवर त्याचा परिणाम होतो. सर्वसाधारणतः चेहरा, संवेदनशील शरीरभाग, योनी मार्ग या संसर्गामुळे प्रभावित होण्याची शक्यता असते.

अॅस्परगिलोसिस : कवक प्रकारच्या बुरशीमुळे होणारा हा संसर्ग आहे. ज्यांची प्रतिकारक्षमता कमजोर आहे, त्यांच्यामध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. या संसर्गाचा प्रभाव फुफ्फुसे आणि सायनसवर पडत असल्यामुळे गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT