प्रतिकात्‍मक छायाचित्र. Pudhari
आरोग्य

AI Brain Aging Study : मेंदूच्या वेगवेगळ्या भागांच्या वयाचा अंदाज बांधणारे ‘AI’ तंत्रज्ञान विकसित, नवीन संशोधनात काय आढळलं?

वयानुसार बौद्धिक व मानसिक क्षमतेवर होणार्‍या परिणामांवर संशोधनात प्रकाशझोत

पुढारी वृत्तसेवा

AI Brain Aging Study : मानवी मेंदूतील विविध भागांमधील वयोमानानुसार होणारे बदल आणि त्यांच्यात दिसणारी तफावत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) आधारित नवी प्रणाली शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. मेंदूच्या विविध भागांमधील हे बदल माणसाच्या वयानुसार त्याच्या बौद्धिक व मानसिक क्षमतेवर कसा परिणाम करतात, यावरही या संशोधनातून प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रसिद्ध ‘प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

मेंदूचे सर्वच भाग एकाच गतीने वृद्ध होत नाहीत...

"मेंदूचे सर्वच भाग एकाच गतीने वृद्ध होत नाहीत. काही भाग दीर्घकाळ सक्षम राहतात, तर काही भागांवर वय आणि आजारांचा परिणाम वेगाने होतो. मेंदूच्या ठरावीक भागांच्या वाढत्या वयाचा (लोकल ब्रेन एजिंग) अभ्यास करून, मेंदूचा कोणता भाग अपेक्षेपेक्षा वेगाने वृद्ध होत आहे आणि त्याचा बौद्धिक क्षमतेवर कसा परिणाम होतोय, हे ओळखणे आता शक्य होणार आहे," अशी माहिती या संशोधनाचे प्रमुख आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया’चे सह-प्राध्यापक आंद्रेई इरिमिआ यांनी दिली.

पारंपरिक पद्धतींपेक्षा अत्यंत अचूक

यापूर्वीच्या पारंपरिक पद्धतींमध्ये संपूर्ण मेंदूचे एकत्रित सरासरी वय (ब्रेन एज) काढले जात असे. यामुळे मेंदूच्या वेगवेगळ्या भागांतील सूक्ष्म बदल स्पष्ट होत नसत. मात्र, या नव्या एआय मॉडेलमुळे व्यक्तीच्या प्रत्यक्ष वयाच्या तुलनेत त्याच्या मेंदूतील विशिष्ट भागांचे वय नेमके किती आहे, याचा सविस्तर नकाशाच समोर येतो. यामुळे मेंदूचा नैसर्गिक क्षय आणि अल्झायमरसारख्या गंभीर आजारांचे अचूक निदान करणे सोपे होणार आहे.

१६ हजारांहून अधिक एमआरआय स्कॅन्सचा अभ्यास

संशोधकांनी ६ मोठ्या सार्वजनिक डेटासेटमधून १९ ते १०० वयोगटातील १४,७४८ निरोगी व्यक्तींचे एमआरआय स्कॅन वापरले. त्यानंतर अल्झायमरचे रुग्ण आणि मध्यम बौद्धिक समस्या असलेल्या आणखी १,९०० हून अधिक एमआरआय स्कॅन्सवर याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष

  • निर्णय क्षमता आणि स्मरणशक्तीशी संबंधित असलेले मेंदूचे ‘फ्रंटल’ आणि ‘टेम्‍पोरल ’ भाग हे इतर भागांच्या (पॅरिएटल आणि ऑक्सिपिटल) तुलनेत अधिक वेगाने वृद्ध होत असल्याचे आढळले.

  • व्यक्ती डावखुरी असो वा उजव्या हाताने काम करणारी, मेंदूचा उजवा भाग (राइट हेमिस्फियर) हा डाव्या भागापेक्षा काहीसा अधिक वृद्ध झाल्याचे दिसून आले.

  • अल्झायमर किंवा स्मरणशक्ती कमजोर झालेल्या रुग्णांमध्ये मेंदूच्या 'हिप्पोकॅम्पस' आणि 'अमिग्डाला' या स्मरणशक्तीशी संबंधित गाभ्याच्या भागांचे जैविक वय अधिक आढळले.

संशोधनात काय सिद्ध झाले?

मेंदूचे वय आणि प्रत्यक्षातील बौद्धिक कार्यक्षमता यांच्यातील थेट संबंध या संशोधनामुळे सिद्ध झाला असून, अल्झायमरसारख्या आजारांचे वेळेत निदान करण्यासाठी ही एआय प्रणाली अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT