बदललेल्या जीवनशैलीमुळे सध्याच्या काळात लोकांना पुरेशी झोप घेणे अगदी दुरापास्त झाले असून देशातील तब्बल ३० टक्के लोक निद्रानाश, तर १० टक्के लोक स्लीप अॅप्नियासारख्या आजारांनी त्रस्त आहेत. (Sleep Problems)
मोबाईलचा अतिरिक्त वापर हा झोपेसंबंधी समस्यांमागील मुख्य कारण असल्याचे निरीक्षण इंदूरमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत देशविदेशातील डॉक्टरांनी नोंदविले. साऊथ ईस्ट एशियन अॅकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनद्वारा ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
एखादी व्यक्ती झोपेत घोरते म्हणजे ती गाढ झोपेत असते, असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, डॉक्टरांच्या मते, तसे काही नसून घोरणे हे झोपेसंबंधी निगडित काही विकारांचे प्राथमिक लक्षण मानले जाते.
घोरण्याची समस्या पुढे स्लीप अॅप्निया, उच्च रक्तदाब, हृदयरोग तसेच स्ट्रोक्सचे कारण बनते. घोरण्यापासून सुटका करण्यासाठी बाजारात काही उपकरणेही उपलब्ध आहेत. झोपेपूर्वी आपल्या दातांमध्ये लावायचे मॅडिबुलार अॅडव्हान्समेंटसारखे उपकरण या समस्येवर उपयुक्त ठरत आहे. याशिवाय झोपेची गुणवत्ता तपासण्यासाठीही काही उपकरणे उपलब्ध आहेत.
कोचिंग सेंटरमध्ये शिकणाऱ्या १०० मुलांपैकी ६० मुलांना चांगली झोप घेता येत नसल्याची बाब एका पाहणीत उघड झाली.
त्यामागे रात्रीचे अध्ययन, तणाव, मोबाईलचा वापर अशी अन्य कारणे असून या मुलांना अॅलर्जी तसेच श्वसनासंबंधी विकार जडण्याची शक्यताही अधिक असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
झोपेसाठी एक विशिष्ट वेळ निश्चित करा.
बेडरुममध्ये शांत आणि थंड वातावरण, अंधार आवश्यक.
आरामदायी बेड आणि उशीचा वापर करा.
दिवसा शक्यतो नैसर्गिक प्रकाशात वेळ व्यतित करा.
सायंकाळनंतर कॉम्प्युटर, मोबाईलचा निळसर प्रकाश टाळा.
नियमित योगा करून तणावापासून दूर राहणे.
झोपेपूर्वी तीन-चार तास अगोदर व्यायाम करणे.
झोपण्याआधी अधिक पाणी न पिणे.
भरपेट जेवण, कॅफिन तसेच मद्यपान न करणे.